Latest

जलपर्णीचा विळखा रोखणे क्रमप्राप्त

Arun Patil

नागरिकांचा प्राथमिक शिक्षण व आरोग्य जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच शुद्ध पाणी मिळणे हासुद्धा अधिकार आहे. आज सगळेच जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. वाढते प्रदूषण रोखणे हे सरकारचे काम आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने हा लेखप्रपंच.

नमामि गंगे या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील गंगा नदीला पूर्ववत निर्मल व प्रदूषणरहित करण्याचे अभियान सुरू आहे. 2014 पासून 2019 पर्यंतच्या कार्यक्रमात 20,000 कोटी रुपये खर्च पडले. गंगा मात्र आज पूर्वी होती, तशीच काहीशी आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व दिल्ली केंद्रशासित प्रदेश या राज्यांत ही योजना होती. त्यासाठी 231 उपाययोजना कार्यन्वित करण्यात आल्या होत्या. देशातील सर्वच नद्या या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांना या उपाययोजना राबवल्या पाहिजेत. केवळ कागदावर योजना राहिल्याने व त्याविषयी आस्था न राहिल्याने आज प्रदूषणाचे गंभीर परिणाम म्हणून जलपर्णी विस्तारलेली दिसून येत आहेत.

देशातील नैसर्गिक जलस्रोत हे सारेच प्रदूषित झालेले आहेत. गाव पातळीवरील ओढे, नाले, झरे, तळी, तलाव यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. काही जलस्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अनेक उद्योगधंदे विकसित होत असताना त्याद्वारे होणार्‍या प्रदूषणाबाबत स्थानिक स्वराज्य संस्था दखल घेत नाहीत. नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, पात्रांत होणारी अतिक्रमणे, औद्योगिक कचरा, शेतीचा वाहून गेलेला भाग, रसायने, उष्टावळ, निर्माल्य, प्राण्यांचे मृतदेह, अस्थी विसर्जन अशा अनेक कारणांनी नद्या प्रदूषित झाल्या आहेत. अशा नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. 30 वर्षांपूर्वी नदीत पोहणे सोपस्कर होते, ते आज राहिले नाही. प्रदूषित नद्यांमुळे रोगराई पसरते. एकदा नदी प्रदूषित झाली की, तिथे जलपर्णी अधिक वेगाने वाढते. कितीही काढली तरी ती प्रदूषणामुळे पुन्हा वाढत जाते. अशा जलपर्णीमुळे जैवविविधता नष्ट होत चालली आहे. ही चिंताजनक बाब आहे.

जलपर्णीच्या संकटाने देशातील सर्वच नद्या बाधित झाल्या आहेत. जलपर्णी हिवाळ्याअखेर नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य असते. दूषित पाणी, त्यात असलेले नायट्रेट-फॉस्फेटचे अंश आणि भरपूर सूर्यप्रकाश हा जलपर्णीला वाढीस कारक ठरतो. कितीही काढली तरी ती वाढतच राहते, कारण नदीच्या पात्रात तिचे खाद्य प्रदूषित पाण्यामुळे असते. शहरांतील पालिका दरवर्षी त्यांचा नयनाट करण्याचा प्रयत्न करतात.

जलपर्णी मूळ अमेरिकेतील; पण ती आज जगाची डोकेदुखी झाली आहे. तिचा पसारा सार्‍या नद्या व मोठ्या तलावांत दिसून येतो. पाण्यावर तरंगणारी हिरवी वनस्पती, लांब देठ व जाड हिरवी पाने, त्यावर येणारी जांभळ्या रंगाची फुले यामुळे नदीवर कुणी गालिचा अंथरल्यासारखा वाटतो. हाच हिरवा गालिचा जैवविविधता नष्ट करण्याचा मार्ग ठरला आहे. जलपर्णीमुळे प्रदूषण होत नसून, ती दूषित खाद्यावर जगत असल्याने एकप्रकारे जल स्वच्छ करत असते; परंतु त्याहीपेक्षा जैवविविधता नष्ट झाली आहे. पाण्यावरील तिच्या घट्ट थरामुळे प्रवाह मंदावतो. तिच्याद्वारे होणार्‍या परागसंश्लेषणाच्या प्रक्रियेत पाणी उडून जाते. घट्ट थरामुळे डासांसारख्या कीटकांची पैदास वाढत जाते. पाण्यातील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात शोषून घेतला जातो व पाण्यात सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा निर्माण होतो. पाण्यातील जीवांसाठी जलपर्णी धोकादायक ठरते. ती फोफवायला लागली की, तिला थोपवणे अवघड बनते.

ओढे, नाले, झरे, तळी, तलाव, नदी या नैसर्गिक स्रोतांत सांडपाणी व प्रदूषित घटक जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रदूषणकारक घटकांवर नियंत्रण आणले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी विशेष साहाय्य व अधिकार दिले पाहिजेत. कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे असल्यास जल प्रदूषणावर नियंत्रण आणता येते. जल प्रदूषण वाढले की, तिथे जलपर्णी वाढणारच ! भारतीय संस्कृतीमध्ये नदीला पवित्र मानले जाते. तिचे पावित्र्य राखायचे असेल तर जलपर्णीचा राक्षसी विळखा रोखाव लागेल. आणि यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, तेव्हाच भविष्यातील पिढीला स्वच्छ पाणी मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT