Latest

Sovereign Gold Bond Scheme : सार्वभौम सुवर्णरोखे योजना! स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अधिक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी डेस्क : जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेची Sovereign Gold Bond Scheme (SGBS) दुसरी सीरिज २२ ऑगस्ट रोजी खुली होत आहे. २०२२-२३ मधील एसजीबीएसची ही दुसरी सीरिज आहे. या योजनेत तुम्ही २६ ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक करु शकता. सार्वभौम सुवर्णरोखे ही योजना भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून राबविली जाते.

या योजनेत प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५,१९७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर प्रति ग्रॅम ५० रुपये डिस्काउंट मिळणार आहे. RBI ने १९ ऑगस्ट रोजी या योजनेची सविस्तर माहिती जारी केली आहे. डिस्काउंटमुळे गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोने ५,१४७ रुपयांना मिळणार आहे. या गोल्ड बाँड योजनेत भारतीय नागरिक, ट्रस्टस, विद्यापीठ आणि चॅरिटेबल संस्था गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा कालावधी ८ वर्षाचा आहे. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता. या योजनेत कोणताही गुंतवणूकदार कमीत कमी एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा ४ किलोग्रॅम एवढी असेल. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.

गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडचे पेमेंट कॅश, डिमांट ड्राफ्ट, चेक या डिजीटल माध्यमातून करता येते. कॅश स्वरुपात कमाल २० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. जर याहून अधिक गुंतवणूक करायची असेल तर त्याला दुसऱ्या माध्यमाचा वापर करायला हवा. गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के फिक्स्ड रेटनुसार व्याज मिळेल. याचे पेमेंट नॉमिनल व्हॅल्यूवर प्रत्येक सहामाही असे मिळेल. ही सरकारची योजना आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणतीही जोखीम नाही. ही योजना सोन्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते. फिजिकली गोल्डच्या सुरक्षेची मोठी समस्या आहे. यामुळे सोन्याची चोरी होण्याची भिती असते. पण गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने सोने चोरीची चिंता मिटते.

सोने खरेदीवर कसलाही कर नाही…

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सार्वभौम सुवर्णरोखे (Sovereign Gold Bond Scheme) योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर सोन्याचे बार अथवा सोन्याच्या नाण्याऐवजी एक कागद दिला जातो. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ही डिजिटल आणि डिमॅट अशा स्वरूपातदेखील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. जेव्हा आपण दुकानांत सोने खरेदी करतो तेव्हा सोन्याच्या दागिन्यावरील घडणावळ खर्च द्यावा लागतो. सोन्याच्या किमतीवर तीन टक्के जीएसटी आहे. तर घडणावळवर ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे. यामुळे दुकानात सोने खरेदी करताना ते ग्राहकांना महाग पडते. पण सुवर्णरोखे योजनेतील सोन्याच्या गुंतवणुकीवर कसलाही कर आकारला जात नाही. ही गुंतवणूक रोखे स्वरुपात असल्याने त्यावर घडणावळ शुल्कही आकारले जात नाही.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT