Latest

Solapur : भाजपचा तडीपार उपमहापौर अखेर पोलिसांच्या अटकेत

backup backup

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : तडीपार आदेशाचा भंग करून सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur) हद्दीमध्ये राजरोसपणे फिरणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या तडीपार उपमहापौराला मोहोळ पोलिसांनी १६ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता गजाआड केले. राजेश दिलीप काळे (रा. जुळे सोलापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर (Solapur) महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. राजेश काळे यांच्या वर्तणुकीमुळे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस उपायुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे राजेश काळे यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी सोलापूर पोलिसांकडून राजेश काळे यांना दौंड तालुक्यात सोडण्यात आले होते.

दरम्यान राजेश काळे हा तडीपार आदेशाचा भंग करून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी पथकाचे इन्चार्ज हेड कॉ. शरद ढावरे, पो.कॉ. हरिदास थोरात, पांडुरंग जगताप, गणेश दळवी यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता अर्जुंनसोंड पाटी येथील हॉटेल येरमाळा येथे छापा टाकला असता, राजेश काळे पोलीस पथकाच्या हाती लागला.

या प्रकरणी पो. कॉ. पांडुरंग जगताप यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश दिलीप काळे यांच्या विरोधात तडीपारीचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉ. शरद ढावरे हे करीत आहेत. या गुन्ह्यामुळे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या अडचणीत वाढ झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT