Latest

Pune Police : आता पुणे पोलिस आयुक्तालयात सहा झोन! गृह विभागाने प्रस्ताव मागविला

अमृता चौगुले
पुणे : शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि हद्दीचा विचार करता, लवकरच पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा विस्तार होणार असून, नव्याने झोन (परिमंडळ) सहाची निर्मिती करण्यात येणार आहे.  याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाने मागविला आहे, त्यामुळे नव्याने होणार्‍या पोलिस ठाण्यांचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयाचा कारभार पाच झोन आणि तेहतीस पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून चालतो.
कायदा व सुव्यवस्थेचे सुसूत्रीकरण व पोलिस यंत्रणेवरचा ताण कमी होण्यासाठी नव्याने सहा पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतच प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ व फुरसुंगी ही नवीन पोलिस ठाणे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. नव्याने होणार्‍या झोन सहामुळे या पोलिस ठाण्यांना लवतरच मुहूर्त लागेल असे दिसून येते.
सध्या शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत 33 पोलिस ठाणी असून, दररोज शेकडो तक्रारींची प्रकरणे येथे दाखल होत असतात. हा कारभार पाच परिमंडळांमध्ये विभागला आहे. पुणे पोलिस हे मुंबईनंतर राज्यातील सर्वात वेगवान व स्मार्ट पोलिसिंगसाठी ओळखले जातात. त्यामुळे या कामात आणखी सुसूत्रता निर्माण व्हावी म्हणून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सहाव्या झोनची निर्मिती करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पूर्वीची पोलिस ठाणी आणि नव्याने होणार्‍या पोलिस ठाण्यांचा समावेश करून झोन सहाची निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान नव्याने होणार्‍या झोनमुळे पूर्वी असलेल्या पाच झोनची रचनादेखील बदलणार असून, काही पोलिस ठाणी सध्या असलेल्या झोनमधून इतर झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

आणखी सहपोलिस आयुक्त हवेत

वाढती लोकसंख्या, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या,  अशातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडणार्‍या राजकीय घडामोडी, त्यातून व्हीव्हीआयपी, राजकीय पुढार्‍यांचे वाढलेले पुण्यातील दौरे, पुढार्‍यांची विशेष सुरक्षा या सर्व बाबींवर  कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सहपोलिस आयुक्तांना लक्ष ठेवावे लागते आहे. त्यामुळे शहराला आणखी एका सहपोलिस आयुक्तांची गरज असल्याचे दिसून येते. कायदा व सुव्यवस्थेसाठी एक, तर प्रशासन, क्राईम, ट्रॅफिकसाठी एक असे दोन सहपोलिस आयुक्त पुणे पोलिस आयुक्तालयाला भविष्यात मिळू शकतात. गृहविभागही त्यासाठी तयार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे वाढतोय ताण

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक नवी गावे शहराशी जोडली जात आहेत. त्यामुळे  पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. त्याचा विचार करून नव्या सहा पोलिस ठाण्यांची भर लवकरच पडणार आहे. झोन सहाच्या माध्यमातून लवकरच पुणे पोलिस आयुक्तालयाचा कारभार चालविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील   मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे.

किती आहे मनुष्यबळ?

शहर पोलिस आयुक्तालयाची हद्द सध्या 1 हजार 80 चौरस किलोमीटर असून, 9 हजार 379 एवढे मनुष्यबळ पोलिस आयुक्तालयासाठी मंजूर आहे. त्यातील 9 हजार 100 मनुष्यबळ उपलब्ध आहे. पहा एका दृष्टिक्षेपात पोलिस आयुक्तालयाकडील मनुष्यबळ (पुरुष आणि महिला)
पोलिस आयुक्त ः 1
सहपोलिस आयुक्त ः 1
अपर पोलिस आयुक्त ः4
पोलिस उपायुक्त ः 10
सहायक पोलिस आयुक्त ः 24
पोलिस निरीक्षक ः 149
सहायक पोलिस निरीक्षक : 201
पोलिस उपनिरीक्षक : 458
सहायक पोलिस फौजदार : 821
पोलिस हवालदार : 2379
पोलिस नाईक : 5039
चालक : 277
पुणे पोलिस आयुक्तालयाचा वाढता विस्तार पाहता, कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलिसांच्या कामात सुसूत्रता निर्माण व्हावी, म्हणून झोन (परिमंडळ) सहाची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतच प्रस्ताव गृहविभागाने पुणे शहर पोलिसांकडे मागितला आहे. सध्या असलेली पोलिस ठाणी आणि नव्याने निर्माण होणार्‍या पोलिस ठाण्यांचा विचार करून झोन सहाची निर्मिती करण्यात येणार आहे.
-रितेश कुमार, 
पोलिस आयुक्त पुणे शहर 
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT