Latest

कोल्‍हापूर : एकवीस फुटी गणेशमुर्ती विसर्जनाला गर्दी; १०० जणांवर गुन्हा

निलेश पोतदार

कोल्‍हापूर; पुढारी वृत्तसेवा : एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना करुन गर्दी जमवत मिरवणूक काढल्‍या प्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्‍हा दाखल झाला. मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह शंभर कार्यकर्त्यांविरोधात गणेशोत्‍सव कालावधीत दुसर्‍यांदा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गणेश आगमनादिवशीही उत्‍सवमूर्तीची पालखी मिरवणूक काढल्‍या प्रकरणी या मंडळावर गुन्‍हा दाखल झाला होता. मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना केली.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य शासनाने गणेश उत्‍सवाबाबत अनेक निर्बंध लागू केले होते. गणेशमूर्ती केवळ ४ फूट असावी असे आदेश होते.

पण गणेशमूर्ती बनवून तयार झाली असल्‍याचे कारण सांगत शिवाजी चौक तरुण मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे गणेशमूर्ती प्रतिष्‍ठापना केली.

तर शिवाजी चौकात मंडप उभारुन येथे एलईडीद्वारे ऑनलाईन दर्शन सुरु ठेवले होते. यंदाही असेच दर्शन घडविण्‍यात आले.

अशी निघाली मिरवणूक….

शाहू मार्केटयार्ड येथे गतवर्षी प्रतिष्‍ठापना केलेल्‍या गणेशमूर्ती शिवाजी चौक तरुण मंडळाने विसर्जनासाठी रविवारी पहाटे ४ वाजता बाहेर काढली. शाहू मार्केटयार्डातून पहाटेच्‍या सुमारास मूर्ती शिवाजी चौकात आणण्‍यात आली. यानंतर सकाळी सात वाजल्‍यापासून भाविकांची गर्दी झाली होती.

याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे फौजफाट्यासह शिवाजी चौकात दाखल झाले. त्‍यांनी याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली.

यावेळी गणेशमूर्ती दोन वर्षांपासून ठेवण्‍यात आल्‍याने यंदा विसर्जन करणार असा पवित्रा मंडळाने घेतला. अखेर साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्‍तात गणेशमूर्ती विसर्जनासाठी मार्गस्‍थ झाली.

एकमेव एकवीस फूटी मूर्ती…

शहरात विसर्जनासाठी बाहेर पडलेली शिवाजी चौक तरुण मंडळाची एकमेव एकवीस फुटी गणेशमूर्ती होती. या ट्रॅक्‍टरभोवती पोलिसाचे कडे करण्‍यात आले होते. तसेच कमीत कमी कार्यकर्ते विसर्जनात सहभागी होतील अशा सूचना करण्‍यात आल्‍या. कडेकोट पोलिस बंदोबस्‍तात गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणण्‍यात आली.

या प्रकरणी मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह उपाध्‍यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्‍वामी, दिलीप खोत, कमलाकर पोवार, प्रसाद वळंजू, नंदकिशोर जमदाडे, महंमद पठाण, पंडीतराव पोवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील या पदाधिकार्‍यांसह शंभर कार्यकर्त्यांविरोधात गुन्‍हा दाखल झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT