Latest

‘माझी वसुंधरेत’ संगमनेर नगरपरिषद प्रथम; डॉ. मंगरूळे व मुख्याधिकारी यांनी स्वीकारला सन्मान

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

'माझी वसुंधरा अभियान 2.0' मधील नगरपरिषद गटांमधील नाशिक विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार संगमनेर नगरपरिषदेने पटकाविला आहे. संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यालय अधीक्षक राजेश गुंजाळ, सफाई कामगार बिनाबाई जेधे, स्वच्छता निरीक्षक अरविंद गुजर, नोडल अधिकारी सुनील गोर्डे, सतीश बुरुंगुले आदी उपस्थित होते.

संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. यात संगमनेर परिसरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचे योगदान आहे. या घटकांच्या मेहनतीचे फलित म्हणजे आजचा हा सन्मान आहे. अशी प्रतिक्रिया प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरूळे यांनी दिली आहे.

या कामांसाठी मिळाला संगमनेर नगरपरिषदेला पुरस्कार संगमनेर शहराचे हरित अच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने अनेक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन, तसेच संवर्धन करण्यात येत आहे. यापैकी जास्तीत जास्त भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. संगमनेर शहरातील वृक्ष गणना केली आहे. हेरिटेज वृक्षांचे सर्वेक्षण व जिओ टॅग करण्यात आले आहेत. त्यानुसार, संगमनेर शहरात एकूण वृक्ष 23 हजार 650 व 213 हेरिटेज वृक्ष आढळून आले आहेत.

संगमनेर शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील बी. एड. कॉलेज चौक येथे पंचतत्व चौक असे नाव देण्यात येऊन व पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या तत्त्वांचे लोगो उभारण्यात आलेले आहेत. शहरातील दोन विहिरींचे कायाकल्प करण्यात आलेला आहेत. शासकीय इमारतीचे एनर्जी ऑडिट व जल परीक्षण करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर सोलर पॅनल बसवून विजेची 95 टक्के बचत करण्यात आली आहे. शहर धूळ मुक्त करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकामध्ये वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार मिळाल्याने नागरिक आनंदित आहेत.

शहरातील जनतानगर शाळा व संत रोहिदास उद्यान येथे मिया-वाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. दोन ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यासारख्या पर्यावरण संवर्धनाच्या कामांसाठी संगमनेर नगरपरिषदेचा विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT