Latest

Rajysbha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या स्थगित मतमोजणीला पुन्हा सुरुवात

अमृता चौगुले

मुंबई/नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र तसेच हरियाणात राज्यसभा निवडणुकीत (Rajysbha Election 2022) गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाला भेटून भाजपच्या शिष्टमंडळाने केला होता. महाविकास आघाडीनेही असाच आक्षेप घेतला. त्यावर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यानंतर रात्री 1 च्या सुमारास शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले.उर्वरित मतांची मोजणी रात्री करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार रात्री 2 च्या सुमारास मतमोजणीला सुरूवात झाली.

मतमोजणी ऐनवेळी स्थगित झाल्याने राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यसभा निवडणूकच रद्द करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर, सुहास कांदे या तिघांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला होता. यानंतर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आमदार रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप नोंदविला होता. तशी तक्रारही निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाकडून दोघांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले.

भाजपचे शिष्टमंडळ आयोगाला भेटले (Rajysbha Election 2022)

तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय इतरांना मतपत्रिका दाखविल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यसभा निवडणूकच रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतमोजणी सुमारे 7 ते 8 तास थांबली निवडणूक आयुक्तांना भेटलेल्या भाजपच्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि ओम पाठक यांच्या समावेश होता.

शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली. हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांनी आपल्या मतपत्रिका पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय इतरांनाही जाहीरपणे दाखविल्या, असा आक्षेप घेत भाजपने सुरुवातीला ही मते पूर्णपणे बाद करावीत, असा आक्षेप घेतला होता. भाजपने हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदविला होता. राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण तपासण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ चित्रीकरणही मागविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील राज्यसभा निवडणूक मतदान व मतमोजणी कायदा तसेच 1961 मधील निकाल पाहता या मतदारांचे वर्तन हे सरळ सरळ उल्लंघन असल्याचा आक्षेप भाजपने नोंदविला आहे. यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही जोडली आहेत.

असाच प्रकार हरियाणातही झाल्याचा दावा भाजपने केला आहे. तिथे काँग्रेसचे बी. बी. बात्रा आणि किरण चौधरी यांनी आपल्या मतपत्रिका इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने नोंदविला आहे.

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय मतमोजणी होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT