Latest

पुनावळेतील नदीघाट प्रदूषणाच्या विळख्यात

अमृता चौगुले

ताथवडे, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे पवनानदी. याच नदीतून पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, या नदीच्या आसपास असणार्‍या घाटांवर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. असेच काहीसे चित्र पुनावळे नदीघाटावर दिसून येत आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्री अशा एकापाठोपाठ एक सणांमुळे येथील नदी घाटावर निर्माल्य, कचरा, प्लास्टिक पिशव्या यांचा खच दिसून येत आहे. वाहते पाणी आणि कपडे वाळविण्यासाठी मुबलक जागा यामुळे येथील घाटावर कपडे धुण्यासाठी नवरात्रोत्सवापूर्वी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. काही नागरिकांनी या ठिकाणी आपली वाहने धुतल्याने वाहनातील आईलचे तवंग येथील किनार्‍यावर दिसत आहेत. तसेच काहींनी वापरात न येणारे कपडे, चिंध्या नदीकिनारी फेकून दिलेल्या आहेत. त्यामुळे नदीप्रदूषणातही वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपींनी आपला अड्डा बनविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता भविष्यात येथून काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून वेळीच या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

तसेच या ठिकाणाहून दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचे ग्लास, खाद्य पाकीट आदी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात आणखीनच वाढ होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी महापालिकेने लावलेले 'येथे कपडे धुण्यास, अंघोळ करण्यास तसेच वाहने धुण्यास सक्त मनाई' अशा आशयाचे फलक खाली धूळखात पडल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन विविध उपक्रमांद्वारे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करीत असताना येथील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण विभाग मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवरात्रोत्सव काळात नागरिकांनी इथे कपडे धुण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांनी या ठिकाणी अनावश्यक गोष्टी नदी परिसरातच टाकल्यामुळे घाट परिसर अस्वच्छ झालेला आहे. आम्ही दररोज नदी घाटचा परिसर स्वच्छ करत आहोत. नदीपात्रातील निर्माल्य आणि इतर कचरा लवकरात लवकर काढण्यात येईल.
– सिकंदर तामचीकर, आरोग्य सहाय्यक, आरोग्य विभाग

या भागातून वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग

जीवदायिनी असलेल्या नदीचे असे आरोग्य धोक्यात आल्याने स्थानिक प्रशासन नेमके करत काय आहे, असा प्रश्न पडत आहे. तसेच नागरिकांनीही नदीचे पावित्र्य कायम राखले पाहिजे. आपणच आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडवत आहोत.
– मुकुल देशपांडे, पर्यावरणप्रेमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT