Latest

जोतिबा चैत्र यात्रेची तयारी गतिमान

Arun Patil

जोतिबा डोंगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र यात्रा 5 एप्रिल रोजी होणार आहे. यात्राकाळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांमार्फत जोतिबा डोंगर येथे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जोतिबा डोंगर येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सर्व विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. वाहतूक व्यवस्थेत पार्किंग जागा, एकेरी-दुहेरी वाहतुकीचे मार्ग, वीज वितरण, दर्शन मंडपात करण्यात येणार्‍या रांगेची व्यवस्था, ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेली स्वच्छता, पाणी पुरवठा यांचा आढावा घेतला. देवस्थान समितीस पालखी मार्ग व पार्किंग जागेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार कौलवकर, देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी सचिव बनसोडे, शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार डोईजड, सरपंच राधा बुणे, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकट दिन सोहळा उत्साहात

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून मंदिरात ग्रामस्थ व भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी प्रथमप्रहरी सूर्योदयाला प्रकट दिन वेळेनुसार उंट, घोडा लवाजम्यासह मंदिरात आरती सोहळा झाला. यावेळी गुलाल-खोबर्‍याच्या उधळणीत 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा अखंड जयघोष सुरू झाला. यानंतर सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक घालण्यात आला व श्रींची राजेशाही राजदरबारी पूजा बांधण्यात आली. यानंतर मंदिरात होम हवन, प्रसाद वाटप करण्यात आला. दिवसभर असंख्य भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिरात रांगोळी सजावट करण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT