Latest

“पाटणच्या चंबूला शिवसेनेमुळे मंत्रिपद” : शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

मोहन कारंडे

सातारा : इम्तियाज मुजावर : "अजिंक्यतारा किल्ल्याने परकीयांचे वार झेलले तसेच शिवसेनेनेही ५५ वर्षांत वार अंगावर घेतले. सेनेतच आता ४० गद्दार निघाले. पाटणच्या चंबूला शिवसेना नसती तर मंत्रिपदही मिळाले नसते. ३७ वर्षांनंतर त्यांच्या घराण्यात मंत्रिपद आले," असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केला. सातारा येथील शाहू कला मंदिरमधील ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षल कदम आदी उपस्थित होते.

खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार राऊत म्हणाले, 'दोन दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात शिवगर्जना मेळावे झाले. यामध्ये पक्ष गेला, चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना चपराक मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक येऊन भेटले. महाराष्ट्र गद्दारांची बेईमानी विसरणार नाही. त्यांच्या कपाळी इतिहास लिहिला आहे, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, 'मोदी आणि शहांनी महाराष्ट्राला ओळखले नाही. आम्ही मरू पण, वाकणार नाही. आता तर निवडणूक आयोग बेकायदा ठरवलाय. २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिलाय, त्यांना चुना लावू, कागदावर आमचे चिन्ह गेले असले तरी ठाकरे ब्रँड आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे आजारी पडले असताना पंत आणि मिंद्यांनी कट रचला. याचा आपण सूड घेऊया. भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत पलटी मारली. २०२४ मध्ये सूड घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करू, असे आवाहन राऊत यांनी केले.

छत्रपतींच्या वंशजांची तडजोड…

राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भाजपशी तडजोड केली. भाजपला कधीच शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. पण आता पंत सातारामध्ये नेमणुका करायला लागले आहेत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. ही स्वाभिमान्यांची गादी आहे. स्वाभिमानासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला पण ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत. पण त्यांच्या वंशजांनी मात्र भाजपसोबत तडजोड केली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT