कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील पीर पंजांच्या सातव्या दिवशीच्या ९ पीरांच्या भेटी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात राजवाडा येथे पार पडल्या. कमिटीच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करत, सायंकाळी ७ वाजता पीर बाहेर काढण्यात आले. नियमानुसार वेळेची मर्यादा लक्षात घेत, रात्री पावणेबारा वाजता सर्व पंजाभेटी पूर्ण झाल्या.
कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेला पंचाभेटीचा कार्यक्रम यावर्षी उत्साहात पार पडला. २ वर्षानंतर यावर्षी भेटीसाठी पीर मशिदीतून बाहेर निघाल्याने पंजाभेटी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भेटी शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
यापूर्वी पंजाभेटीचा कार्यक्रम हा पहाटे ४ वाजेपर्यंत चालत होता, पण या दरम्यान महिला व भाविकांची वेळेमुळे मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. भाविकांची ही अडचण लक्षात घेता, शहर पीरपंजा कमिटीने सायंकाळी 7 वाजताच पीर बाहेर काढण्याचा ठराव केला होता. त्यामुळे सातव्या दिवशी बागवान पीर सायंकाळी ७ वाजता बाहेर काढल्यानंतर शहरातील इतर ९ पीर ही वेळेत बाहेर पडले. यांची पहिली भेट पावणे दहा वाजता झाली. तर सर्व पंजाभेटी या पावणेबारा वाजता सर्व नियमांचे पालन करत संपन्न झाल्या.
शुक्रवारी रात्री (दि.0५) मोहरमच्या सातव्या दिवशीच बागवान पीर, मोमीन पीर, कारखाना पीर, कुडेखान पीर, बट्टी पीर, खाटीक पीर, एकता पीर, ढेपणपूर पीर, शेळके पीर या ९ पिरांच्या राजवाडा येथे बिबी फातिमा व बारा इमाम पीरा सोबत भेटी संपन्न झाल्या. शहरातील सन्मित्र चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, दर्गा चौक ते राजवाडा या प्रमुख मार्गावरून पीरांच्या मिरवणुकी निघाल्या. याठिकाणी राखीव पोलिसदल तैनात करण्यात आले होते. भेटीदरम्यान तुरळक पावसाने हजेरी लावली होती.त्यामुळे पीर कमिटीच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. प्रशासक निखिल जाधव यांनी भेटीच्या ठिकाणी पीर नाचवताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून चावडी चौकात मैदानात ग्रीट पसरून सुसज्ज मैदान तयार करण्यात आले होते.