Latest

नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’, पोलिस आयुक्तांचा निर्णय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'वाहतूक कोंडी आणि नाशिककर' असे समीकरण शहरात रुजण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह चौकात नियमित होणारी कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीच्या निवारणासाठी 'ट्रॅफिक वॉर्डन' च्या नियुक्तीचा निर्णय पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला आहे. हे 'ट्रॅफिक वॉर्डन' वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला तैनात असणार आहे.

महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गानुसार २२०० किलोमीटर अंतराचे रस्ते शहरात आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी शहर पोलिसांच्या वाहतूक विभागात तीनशे अंमलदार नियुक्त आहेत. सात किलोमीटर अंतरासाठी सध्या एक अंमलदार कार्यरत आहे. गृहविभागाकडून नाशिक पोलिस दलासाठी वाढीव मनुष्यबळ मंजूर होत नसल्याने पोलिस ठाण्यांसह वाहतूक नियोजनावर ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'ट्रॅफिक वॉर्डन' नेमण्याचे निर्देश आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत.

स्वयंस्फूर्तीने वाहतूक कोंडी फोडण्यासह प्रबोधनासाठी तयार असलेल्या सुमारे दोनशे व्यक्तींना 'ट्रॅफिक वॉर्डन' म्हणून नियुक्त केले जाणार आहे. इच्छुक व्यक्तींना https://forms.gle/qvys1pCNjzsH4Sum7 या लिंकद्वारे १५ जुलैपर्यंत ई-नोंदणी करता येणार आहे. वाहतूक पोलिसांतर्फे त्याची पडताळणी करून निवड झालेल्यांना संपर्क साधण्यात येईल. 'वॉर्डन'ची नियुक्ती ठराविक कालावधी असणार आहे. पोलिस अंमलदार असतानाच 'वॉर्डन'ला काम करता येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

'ट्रॅफिक वॉर्डन' उपक्रमासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नाही. शहर अपघातमुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक नियमनासाठी इच्छुकांनी उपक्रमात सहभागी व्हावे. निवड प्रक्रियेचा सोपस्कार पार पडल्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन'ची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

– मोनिका राऊत, उपआयुक्त (वाहतूक)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT