Latest

Noise pollution : ध्वनिप्रदूषणाचा ‘स्वर’ टिपेला!

Arun Patil

उत्सवप्रिय म्हणवल्या जाणार्‍या भारतात सार्वजनिक उत्सवांच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण हा अलीकडील काळात गंभीर प्रश्न म्हणून समोर येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. परदेशांत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी करण्यात आलेले नियम कसोशीने पाळले जातात. आपणही आता त्या दिशेने ठोस पावले उचलायला हवीत.

नुकत्यार पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीतील आवाजाच्या दणदणाटामुळे पुन्हा ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणारी मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत 55 डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत 45 डेसिबल अशी ध्वनी मर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे देखील निर्देश आहेत. मात्र विसर्जन मिरवणुकीत सुमारे 130 डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात 2018 मध्ये गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे 64 तर 2019 मध्ये 16गुन्हे दाखल झाले होते. मागील 20 वर्षांत यंदा सर्वाधिक आवाजाच्या पातळीची नोंद झाली आहे.

ध्वनिप्रदूषण केवळ उत्सव काळातच होते असे बिल्कुल नाही. आज देशातील बहुतांश महानगरांची स्थिती पाहिल्यास आवाज, आवाज आणि केवळ आवाज! 24 तासांपैकी काही मिनिटेसुद्धा कानांना विश्रांती नाही, अशी झाली आहे. मोठ्या शहरांत लोकांनी या आवाजांची सवय लावून घेतली असली, तरी ती आता घातक ठरू लागली आहे. केवळ अस्वस्थताच नव्हे, तर अनेक आजारांना ध्वनिप्रदूषण कारणीभूत ठरत आहे आणि ही गोष्ट आता गंभीरपणे घ्यावी लागणार आहे. मुंबई हे भारतातील सर्वाधिक ध्वनिप्रदूषण असणारे शहर ठरले असून, राजधानी नवी दिल्लीचा चौथा क्रमांक आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर अनुक्रमे लखनौ आणि हैदराबाद ही शहरे आहेत. याखेरीज अनेक शहरांमध्ये ध्वनिप्रदूषण वाढत चालले असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे घातक परिणाम दिसू लागले आहेत. आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे एकट्या दिल्लीत दररोज 80 लोकांचा मृत्यू होतो, असे दिसून आले आहे. देशाच्या इतर भागांमध्येही प्रदूषणाच्या बळींची संख्या कमी नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत मर्यादांचे वेगवेगळे निकष तयार केले आहेत. रहिवासी विभागात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलच्या वर ध्वनिमर्यादा जाता कामा नये. औद्योगिक क्षेत्रासाठी ही मर्यादा दिवसा 75 आणि रात्री 70 डेसिबलपर्यंत आहे. परंतु या मर्यादा क्वचितच पाळल्या जातात. ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा, उच्च रक्तदाब, तणाव, स्मृतिभ—ंश, निद्रानाश, राग, स्वभावात आक्रमकपणा तसेच डिप्रेशनसारखे आजार जडतात. ध्वनिप्रदूषणामुळे हृदयविकार जडत असल्याचे आता दिसून आले आहे. कारण ध्वनिप्रदूषणामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. तसेच हृदयाच्या धमन्या आकुंचन पावतात.

बहिरेपणाच्या बाबतीत धक्कादायक गोष्ट म्हणजे दरवर्षी 10 हजारांहून अधिक लोकांची श्रवणशक्ती कमी होत असल्याचे आढळून आले आहे. ध्वनिप्रदूषण प्रामुख्याने कारखाने आणि वाहनांमुळे होते. परंतु भारतासारख्या देशात अनेक गोष्टी मवाजतगाजतफ करण्याची प्रथा आहे. जन्म असो वा लग्न, धार्मिक कार्यक्रम असो वा सामाजिक समारंभ, सण असो वा उत्सव, प्रत्येक ठिकाणी ध्वनिक्षेपक दिसतात. बर्‍याच वेळा ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक चढलेला असतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकांच्या आवाजाचा स्तर सर्वाधिक असतो. धार्मिक कार्यक्रमांबाबत लोकांच्या भावनांचा आदर करून यंत्रणेतील अधिकारी कारवाई टाळतात. कारवाई केल्यास असंतोष पसरण्याची भीती असते. परंतु वाहनांमधील कर्कश म्युझिक सिस्टीम आणि अन्य कार्यक्रमांवेळी लावल्या जाणार्‍या ध्वनिक्षेपकांवर कारवाई करून तेवढे तरी प्रदूषण कमी करता येणे शक्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT