कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जन मिरवणुकीत कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. आवाजाच्या दणदणाटामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. सायलेंट झोनसह निवासी आणि व्यावसायिक अशा सर्वच ठिकाणी आवाजाच्या पातळीत वाढ झाल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
पापाची तिकटी परिसरात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत आवाजाची 85.50 डेसिबल इतकी सर्वाधिक पातळी नोंदवली गेली. याशिवाय महाद्वार रोड, गंगावेश याठिकाणी देखील आवाजाची पातळी 82 डेसिबल पेक्षा अधिक होती. 55 डेसिबलच्या पुढील आवाजाची पातळी प्रदूषणासाठी मोजली जाते.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर शहराच्या विविध विभागांत आवाजाच्या पातळीचे मापन करण्यात आले होते. त्यामध्ये सायलेंट झोन, निवासी आणि व्यावसायिक अशा क्षेत्रांमधील 22 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी सर्वच ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा अधिकच उंचावलेली दिसून आली. केवळ औद्योगिक परिसरातच आवाजाची पातळी निश्चित मानकाच्या आत होती.
सायलेंट झोन असलेल्या सीपीआर, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर व शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये देखील ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ पाहायला मिळाली. सीपीआर व न्यायालय परिसरामध्ये आवाजाची पातळी तब्बल 70 डेसिबलपर्यंत नोंदवली गेली.
गेल्या दोन वर्षांतील गणेश विसर्जन मिरवणुकांच्या तुलनेत यंदा ध्वनी प्रदूषणाने मर्यादा ओलांडली. मंडळांकडून लावण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे
ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ पाहायला मिळाली.
– डॉ. आसावरी जाधव,
पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ
हेही वाचा