Latest

पुणे: वादळी वार्‍यात फाईली नव्हे अ‍ॅल्युमिनियम शिट उडाल्या, त्या व्हायरल व्हिडीओवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी वादळी वारा आणि पावसाच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फाईल उडत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यावर मोठ्याप्रमाणात चर्चा होऊन, इमारतीच्या बांधकामावरच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर चार दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे अथवा नस्त्या उडाल्या नाहीत, असे सांगितले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' अशा चार विंग आहेत. 'अ' आणि 'ब' विंगमध्ये विविध कार्यालये 'क' विंगमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने व 350 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि 'ड' विंगमध्ये 4 मजली वाहनतळ अशा इमारती आहेत. वाहनतळाच्या इमारतीमधून कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयामध्ये येण्यासाठी 5 मजल्यावर कॉरीडॉर्सची व्यवस्था केलेली आहे. सदर कॉरीडॉर्सच्या आर.सी.सी स्लॅबखाली आभासी छत (फॉल्स सिलींग) केलेले आहे.

शुक्रवारी आलेल्या वादळामध्ये वार्‍याच्या प्रचंड वेगामुळे या आभासी छताचे बरेचसे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले. सदरचे पॅनल्स वादळात उडतानाची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) झाली. वादळात उडणारे पॅनल्स नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नस्ती (फाईल्स) उडाल्या असा गैरसमज सर्वत्र पसरला. तथापि, या वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कागदपत्रे, फाईल्स उडाल्या नाही तसेच इमारतीस कुठेही बाधा पोहोचलेली नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आता कॉरिडॉर्समधील सर्व आभासी छत फ्रेमवर्कसह व्यावस्थितरित्या काढून घेण्यात येतील. त्यातील क्षतिग्रस्त झालेले पॅनल्स वगळता उर्वरित चांगले पॅनल्स सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नजीकच्या भविष्यात बांधकामे प्रगतीत असलेल्या इमारतींच्या कार्यालयीन कक्षामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी वापरण्यात येतील.

सेवा वाहिन्याच्या देखभालीसाठी पॅनल्स

कॉरीडॉर्स दोन्ही बाजूस 5 मजली असून 3 मी रुंदीचे आहेत व आभासी छताचे एकूण क्षेत्रफळ 8 हजार चौरस फूट आहे. आभासी छतामध्ये 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे पॅनल्स हे अल्युमिनियम फ्रेमवर तंरगते म्हणजेच आवश्यक तेव्हा काढता येण्यासारखे ठेवलेले असतात. आरसीसी छत व आभासी छत यामधील सेवा वाहिन्याच्या देखभालीच्यादृष्टीने सदरचे पॅनल्स हे अडकवलेल्या स्थितीत ठेवलेले असतात.

भविष्यात आभासी छत न उभारण्याचा निर्णय

जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर आभासी छतामध्ये असलेले विद्युत संच हे आरसीसी छताच्या तळाशी जोडून घेण्यात येत आहेत. तसेच छताच्या तळभागास पांढरा रंग देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भविष्यात हाती घेण्यात येणार्‍या इमारतींच्या बांधकामामध्ये कॉरीडॉर्स तसेच खुले पॅसेजेसच्या ठिकाणी आभासी छताची उभारणी न करण्याची दक्षता घेण्यात येत आहे, असे सां.बा.प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT