Latest

नाशिक : निमा पॉवर प्रदर्शनात राज ठाकरेंचा उद्योजकांशी संवाद; आज गाठणार गर्दींचा उच्चांक

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देत उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टॉलला भेटी देत विविध इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटची माहिती जाणून घेतली. दरम्यान, प्रदर्शनाच्या दोनच दिवसांत ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिला. रविवारी (दि.२१) सुट्टीचा वार असल्याने, गर्दीचा उच्चांक साधला जाण्याची शक्यता आहे.

त्र्यंबक रोडवरील आयटीआय काॅलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या निमा पॉवर प्रदर्शन-२०२३ मध्ये विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनीही प्रदर्शनाला भेट देत आयोजकांचे कौतुक केले. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नागपूरचे आमदार मोहन मोरे, ई-स्मार्टचे संचालक सुरेश शाह, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, भाजपचे नाशिक मध्य मंडलाध्यक्ष देवदत्त जोशी आदींनी प्रदर्शनाला भेट देत कौतुक केले. येत्या दोन दिवसांत गुंतवणुकीचे परस्पर सामंजस्याचे अनेक करार होणार असून, त्याद्वारे नाशिककरांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला. प्रदर्शन म्हणजे राज्यातील इतर उद्योजकांसाठी आदर्शवत आहे. निमाच्या पुढाकाराने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आणि प्रदर्शन केंद्र मंजूर झाले. तसेच नाशिकमध्ये मोठे प्रकल्प येत आहेत, ही आनंददायी बाब असल्याचे प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी सांगितले.

प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर लोकांनी देशभरातून आलेल्या उद्योजकांच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक विषयक उत्पादने आणि नावीन्यपूर्ण कलाविष्काराचे कौतुक केले. प्रदर्शनात शनिवारी (दि.२०) सीपीआरआयचे सहसंचालक एस. श्यामसुंदर, डब्ल्यू. आर. सोलरचे संचालक वेदांत राठी, ई-स्मार्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक आनंद राय तसेच एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. निमाचे पदाधिकारी शशांक मणेरीकर, श्रीकांत पाटील, राजेंद्र वडनेरे आणि राजेंद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

कोविडमुळे गेली दोन वर्षे उद्योजक धास्तावला होता. त्यामुळे निमातर्फे आयोजित या प्रदर्शनाला किती प्रतिसाद मिळतो याबाबत उद्योजक आणि आयोजकांना उत्सुकता होती. परंतु गेल्या दोन दिवसांत प्रदर्शन बघण्यास झालेली गर्दी बघता उद्योजक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे प्रदर्शन आणखी दोन दिवस लोकांना बघण्यासाठी खुले असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांचे नावीन्यपूर्ण कलाविष्कार बघण्याची संधी दवडू नका. -मिलिंद राजपूत, चेअरमन, निमा पॉवर प्रदर्शन.

प्रदर्शनाची वेळ वाढवली
स्टॉलधारकांच्या तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी मागणीनुसार प्रदर्शनाची वेळ रात्री ९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT