Latest

नंदुरबारला अवकाळीचा फटका, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश

गणेश सोनवणे

नंदुरबार : सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. कुठे हलक्या कुठे जोरदार सरी कोसळणे नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही चालू असून कापूस पपई केळी यासह इतर पिकांनाही फटका बसला आहे. दरम्यान, शेतपिकांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी पाऊस चालू असून संपूर्ण जिल्ह्यात धुक्याची दाट चादर पसरली आहे. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी वादळा सह आलेल्या पावसाने धान्य बाजारात आणि भाजी मार्केटमध्ये दाणादाण उडवली. रात्री जोरदार विजांच्या कडकडाटासह चालू असलेल्या पावसाच्या सरी आज 27 नोव्हेंबर रोजी देखील सकाळपासून चालूच आहेत. यादरम्यान शहादा तालुक्यातील बोरद येथे शेतात काम करणाऱ्या सपना ठाकरे या युवतीचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. शहादा आणि तळोदा येथे लोकवस्तीत वीज कोसळण्याच्याही घटना घडल्या. तथापि त्यात कोणतीही हानी झाली नाही.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व अनुषंगिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका शासनाची नेहमीच राहीली आहे, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनीही संबंधित तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT