Latest

गुरुजींची वैद्यकीय बिलांसाठी ‘तडफड’; लांजातील ५५० शिक्षकांपैकी ३३४ शिक्षक आजारी

मोहन कारंडे

रत्नागिरी; दीपक कुवळेकर : कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले नेहमीच वादात सापडतात. विशेषकरून शिक्षकांची बिले तर चर्चेत येतात. लांजा तालुक्यातील ५५० शिक्षकांपैकी तब्बल ३३४ शिक्षकांनी आजारी असल्याचे दाखवत वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जि. प.कडे सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल ९५ लाखाची ही बिले आहेत. एवढ्याशा छोट्या तालुक्यात इतके शिक्षक आजारी पडतात ही आश्चर्यचकीत करणारी बाब आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक तसेच सरकारमान्य अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वैद्यकीय खर्च देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांना वैद्यकीय बिले शिक्षणाधिकार्‍यांकडे सादर करावी लागतात. १ लाखापर्यंतचे बील मंजूर करण्याचे अधिकार शिक्षणाधिकार्‍यांना आहेत. तर १ लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे अधिकार विभागीय अधिकार्‍यांना आहेत.

दरवर्षी जिल्हाभरातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही वैद्यकीय बिले सादर करतात. यामध्ये टक्केवारीचे गणित असल्याने ही बिले चर्चेतसुद्धा येतात. दरवर्षी काही ना काही हा वाद असतोच. यावर्षी सुद्धा असाच एक वादाचा व आश्चर्यकारक मुद्दा उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या ही ६ हजारच्या घरात आहे. मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ९ तालुक्यांतून जवळपास ५०० शिक्षकांनी या वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी जि. प. कडे प्रस्ताव सादर केले आहेत.

या प्रस्तावामध्ये सर्वाधिक प्रस्ताव हे लांजा व चिपळूण तालुक्यातून आले आहेत. लांजा तालुक्यात एकूण शिक्षकांची संख्या ५५० च्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल ३३४ जणांनी आपण आजारी असल्याचे सांगत वैद्यकीय बिले सादर केली आहेत. तब्बल ९५ लाख रुपयांची ही बिले आहेत. इतकी रक्कम जि. प. ला द्यावी लागणार आहे. मुळात इतक्या छोट्याशा तालुक्यात इतकेजण आजारी पडतात ही आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. कारण इतर तालुक्यांतून १० ते २० इतकेच प्रस्ताव आले आहेत. चिपळूण तालुक्यातून मात्र १०३ प्रस्ताव आले आहेत. या दोन तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव असल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.

'बाम'चे ही बील

लांजा तालुक्यातीलच सर्वाधिक शिक्षक आजारी पडले आहेत. ही बाब कुठेतरी आश्चर्यकारक असली तरी काही शिक्षकांनी तर बाम'चे बील सुद्धा जोडल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT