Latest

Mini Gypsy : “महिंद्रासाहेब, ही गाडी आमची लक्ष्मी; हवंतर तुम्हाला दुसरी गाडी बनवून देतो”

backup backup

स्वप्निल पाटील, सांगली : "महिंद्रासाहेब ही आमची जुगाड गाडी लक्ष्मी आहे ओ… हवे तर तुम्हाला दुसरी गाडी बनवून देतो, पण गाडीची अदलाबदली करून ही जुगाड गाडी देणार नाही. आपण दिलेली गाडी आम्हाला परवडायची नाही, तुमच्या कंपनीसाठी आम्हीही मदत करू, तुम्हाला मदत करायची असेल तर आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मदत करा", अशी भावना सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील जुगाड गाडी तयार केलेल्या लोहार दाम्पत्याने केली आहे. (Mini Gypsy)

सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे दत्तात्रय लोहार आणि राणी लोहार हे अत्यंत सामान्य कुटुंबातील दाम्पत्य राहण्यास आहे. भंगारातल्या साहित्यातून जुगाड करीत त्यांनी एक चारचाकी बनवली आहे. ती सध्या चर्चेत आहे. दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केलेल्या या गाडीची थेट आनंद महिंद्रा यांनी देखील मागणी घातली आहे. त्या बदल्यात त्यांना नवी कोरी बोलेरो गाडी देण्याचं जाहीर केला आहे. पण लोहार दाम्पत्य आनंद महिंद्रा यांच्या ऑफरबाबत द्विधा मनस्थितीत असून जुगाड गाडी ऐवजी दुसरी गाडी तयार करून देऊ अशी, भाबडी इच्छा व्यक्त केली आहे.

दत्तात्रय लोहार यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. परंतु चारचाकीमधून फिरण्याची त्यांच्या मुलाची इच्छा होती. त्यामुळे लोहार यांनी दुचाकीचे इंजिन आणि भंगारातील साहित्य या सर्वांचा वापर करत एक टुमदार जुगाड गाडी तयार केली आहे. पेट्रोलवर धावणारी आणि किक मारून सुरू होणारी ही गाडी असून या गाडीचा लुक हा जीप प्रमाणे आहे. ताशी 45 किलोमीटर आणि प्रति लिटर 45 किलोमीटर मायलेज आणि चौघे बसण्याची क्षमता आणि लेफ्ट हॅन्ड ड्रायव्हिंग या गाडीचे वैशिष्ट्य आहेत.

दत्तात्रय लोहार यांचे पत्नी, मुलगा, दोन मुली, आई असे सहा जणांचे कुटुंब आहे. त्यांची एकरभर शेती असून ती देखील वाटणीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे ते फॅब्रिकेशनच्या व्यवसायाकडे वळल्याचे सांगतात. वेल्डींग आणि धार लावण्याच्या व्यवसायातून कुटुंब चालविण्याइतपत तुंटपुंजी रक्कम मिळते. याच पैशातून बचत करून दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी ही गाडी बनवली. मुलांची इच्छा आणि आपल्याही दारात चार चाकी गाडी असावी, पण घेण्याची ऐपत नसल्याने स्वतःच चारचाकी गाडी बनविण्याची असलेली जिद्द यामुळे लोहार यांनी अखेर 2 वर्षानंतर 60 ते 70 हजार रुपये खर्च करून ही गाडी बनवली आहे. ते या गाडीला घरची लक्ष्मी मानत असल्याने त्यांनी ही गाडी महिंद्रा यांना देण्यास नकार दिला आहे.

आमचे मालक लयं हुशार… तुमच्याच कंपनीला मदत करतील

आनंद महिंद्रा यांनी लोहार यांना बोलेरो गाडीची ऑफर दिली आहे. ती स्वागतार्ह आहे. परंतु आम्ही खूप कष्टातून ही गाडी बनवली आहे. ही आमच्या घरची लक्ष्मी आहे. तुम्हाला कशी द्यायची. हवंतर आम्ही तुम्हाला दुसरी गाडी तयार करून देऊ. पण आमच्या गाडीची आदला-बदली नको अशी इच्छा व्यक्त केली आहे. बोलेरोमध्ये बसण्याची आणि त्यात इंधन घालण्याची ऐपत नसून आम्हाला ही जुगाड गाडीच परवडत असल्याचे लोहार यांच्या पत्नी राणी लोहार यांनी म्हटले आहे. तसेच आमचे मालक लयं हुशार आहे. ते तुमच्या कंपनीला मदत करू शकतील, असे लोहार यांच्या पत्नी राणी लोहार यांनी सांगितले. (Mini Gypsy)

हवंतर पोराबाळांच्या शिक्षणासाठी मदत करा

महिंद्रा यांनी आमच्यासाठी गाडी (Mini Gypsy) देण्याचे जाहीर केले ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु ती गाडी घेऊन आम्ही काय करणार, ती गाडी वापरणे आम्हाला परवडायची नाही. आमची परिस्थिती हलाखीची आहे. पोरबाळं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना मदत करायची असेल तर महिंद्रा यांनी पोराबाळांच्या शिक्षणासाठी मदत करावी, अशी भावना देखील या दाम्पत्याने व्यक्त केली आहे.

राज्यमंत्री विश्वजीत कदम गाडीचा खर्च देणार

अत्यंत कष्टाने बनविलेल्या जुगाड गाडीची राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी देखील दखल घेतली आहे. या गाडीसाठी लोहार यांना 60 ते 70 हजार रुपये इतका खर्च आला आहे. तो खर्च देणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जाहीर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT