Latest

अंतर्गत कुरघोड्यांनी ‘मविआ’ त्रस्त

Arun Patil

युद्धाला सामोरे जाताना समोर कोणाशी लढायचे आहे, त्याचे कमकवुत दुवे शोधून काढून मर्मस्थळावर हल्ला करावा लागतो. त्यासाठी युद्धनीती आखावी लागते. लोकसभेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील 'महायुती'च्या तुफानाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) -शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशी महाविकास आघाडी सज्ज झाली खरी. परंतु, महाआघाडी अंतर्गत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांची आपसातच लढाई सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या भूमिकेतील ताठरपणा कायम ठेवला आहे आणि सैन्य व रसद कमी असताना मैत्रीपूर्ण लढतीची भाषा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवण्यापूर्वीच महाआघाडी अंतर्गत बेबनाव हा तुफानाला अडविण्यातील मोठा अडथळा आहे. त्यामध्ये सुधारणा झाली नाही, तर केवळ समन्वयाअभावी महाआघाडीचा तंबू तुफानाला थोपविण्याच्या नादात भगव्या वादळाच्या रेट्याने पालापाचोळ्याप्रमाणे उखडून टाकला जाण्याचा गंभीर धोका आहे.

राज्यामध्ये भाजपविरोधात सध्या तीन कमकुवत पक्षांची लढाई आहे. भाजपबरोबर हातात भगवा झेंडा घेऊन 30 वर्षांचा घरोबा करणार्‍या उद्धव ठाकरेंच्या सेनेची अवस्था विकलांग झाली आहे. त्यांच्या सेनेतून निवडणुकीपूर्वीच 13 विद्यमान खासदारांनी सोडचिठ्ठी घेतली. 40 आमदारांचा सरंजाम भाजपच्या तंबूत दाखल झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या घरातच सुरूंग लागला आहे आणि शतकोत्तर परंपरा व दीर्घकाळ अनभिषिक्त सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसची तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे. अशावेळी मित्रपक्षांना सोबत घेऊन प्रसंगी जागा वाटपात तडजोड करून त्यांनी एकदिलाने लढाईत उतरणे आवश्यक होते. परंतु, या तिन्ही पक्षांचे नेते भूतकाळातून बाहेर येत नाहीत, अशी अवस्था आहे. एकमेकाला विश्वासात न घेता आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. आघाडीअंतर्गत दबावतंत्राच्या पक्षीय राजकारणाचा एक भाग म्हणून ते समजून घेताही आले असते. परंतु, समोर मोदी नावाचे तुफान उभे आहे. साम, दाम, दंड, भेद या सार्‍या आयुधांसह ते मैदानात उतरले आहेत. अशावेळी संयमाने गनिमी काव्याची तयारी करण्याऐवजी आघाडी जर कुरघोड्यांमध्ये रमणार असेल, तर महाराष्ट्रात गत लोकसभेपेक्षा काही वेगळे चित्र दिसणार नाही.

महाराष्ट्रात तसे महायुतीअंतर्गतही जागा वाटपात मतभेद असले, तरी लोकसभेत हॅट्ट्रिक साधण्यासाठी भाजपचा दिल्लीतून येणारा एक संदेश हा वाद मिटवू शकतो. पण महाआघाडी जर जागा वाटपातच प्रतिष्ठा पणाला लावणार असेल, तर मग निवडणुकीच्या रिंगणात एकदिलाने लढणार कसे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यातही गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची दलित-मुस्लिम मतांची हुकमी व्होटबँक काढून घेणार्‍या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशीही महाआघाडीचे सूत जुळलेले नाही. शिवाय, सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचे मोहल्ला दौरे बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना अस्वस्थ करू लागले आहेत.

सोबतीला मतफोडीच्या राजकारणासाठी भाजपची बी टीम कागदावर तयार झाली आहे. या सर्व कठीण परिस्थितीतही मार्ग निघू शकतो. पण त्यासाठी संयम हवा, समन्वय हवा. परंतु, महाआघाडीत नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे. लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची बोलणी झाली, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ती फिस्कटलीही. (तसे ते अपेक्षितही होते) एकूणच जनमताचा भावनात्मक लंबक महाआघाडीकडे थोडा सरकताना दिसत असूनही केवळ अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण महाआघाडीच्या मुळावर येऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT