Latest

Mahapour Trophy : ‘महापौर चषक’ने फुटबॉल हंगामाचा 11 रोजी प्रारंभ

backup backup

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपूर्वी थांबविण्यात आलेल्या 'महापौर चषक' फुटबॉल स्पर्धेने येत्या शुक्रवारी यंदाच्या (2021-22) च्या फुटबॉल हंगामाला प्रारंभ होणार आहे. दि. 11 ते रविवार, दि. 13 फेब—ुवारी रोजी छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. सर्व सामने विनाप्रेक्षक होणार असल्याने फुटबॉलप्रेमींसाठी सामन्यांचे ऑनलाईन प्रसारण करण्यात येणार आहे. (Mahapour Trophy)

कोरोनाचे सर्व नियम पाळून स्पर्धा होणार असल्याची माहिती मनपाच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या वतीने 4 मार्च ते 15 मार्च 2020 या कालावधीत महापौर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना झाल्यानंतर जगभर सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे 13 मार्चपासून स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

यानंतर गेली दोन वर्षे संपूर्ण फुटबॉल हंगामावर बंदी होती. कोरोनाचा कहर सन 2022 मध्ये कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंधांत शिथिलता दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला (केएसए) कोव्हिड 19 व ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संदर्भात जाहीर केलेल्या निर्बंधांचे पालन करण्याच्या अटींवर स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार विनाप्रेक्षक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच, सामना अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड प्रतिबंधक दोन डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्वांची 48 तास आधीची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच मैदानावर प्रवेश देण्यात येणार आहे.

स्पर्धा कालावधीत सर्व घटक होम आयसोलेटेड असतील. मैदानात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मास्क, सामाजिक आंतर सक्तीचे करण्यात आले आहे. रावणेश्वरकडील एकमेव प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. मैदान परिसरात पोलिस बंदोबस्त असणार आहे. रविवारी (दि. 13) बक्षीस समारंभाने स्पर्धेची सांगता होणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले.

पत्रकार परिषदेस माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक सचिन पाटील, विनायक फाळके, प्रकाश मोहिते, राहुल चव्हाण, विजय खाडे, अश्किन आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.

Mahapour Trophy : 4 लाख 20 हजारांची बक्षिसे

विजयी संघ : 1 लाख 50 हजार व चषक / उपविजेता संघ : 75 हजार व चषक / तृतीय व चतुर्थ संघ : 55 हजार रुपये विभागून
पहिल्या फेरीतील 8 बाद संघ : प्रत्येकी 5 हजार (एकूण 40 हजार)/ दुसर्‍या फेरीतील 4 बाद संघ : प्रत्येकी 10 हजार (एकूण 40 हजार)
संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू : 20 हजार / उत्कृष्ट गोलकिपर, डिफेन्स, हाफ, फॉरवर्ड : प्रत्येकी 10 हजार (एकूण 40 हजार)

असे होणार सामने…

शुक्रवार, दि. 11 फेब—ुवारी : दिलबहार तालीम मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, दुपारी 4 वाजता.
शनिवार, दि. 12 फेब—ुवारी : प्रदर्शनीय सामना – लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासकीय अधिकारी, दुपारी 4 वाजता.
रविवार, दि. 13 फेब—ुवारी : प्रॅक्टिस क्लब वि. दिलबहार – फुलेवाडी यांच्यातील विजेता संघ, दुपारी 4 वाजता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT