Latest

अभिमानास्पद! स्वच्छता लीग 2022 मध्ये राष्ट्रीय पातळीवर लोणावळा शहर अव्वल

अमृता चौगुले

लोणावळा : देशातील विविध पर्यटन स्थळांसाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छता लीग 2022 या अभियानात लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहराने आपला डंका वाजवला असून 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या यशामुळे लोणावळा शहराच्या नावाला पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात झळाळी मिळाली आहे.

दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी पर्यटन स्थळांसाठी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन केले गेले होते. या लीगमध्ये देशभरातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटातील एकूण 1850 शहर सहभागी झाली होती. या लीगसाठी कॅप्टन म्हणून काम करीत असलेले लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तलाव ते राजमाची उद्यान आणि सहारा पूल ते भुशी धरण या दोन ठिकाणी स्वच्छता अभियानासोबतच पथ नाट्य, प्लोग अ थोन हे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोणावळा शहराच्या ब्रँड अँबेसिडर असलेल्या अभिनेत्री आयेशा झुल्का, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, रामविलास खंडेलवाल, विशाल पाडाळे, रचना सिनकर, विजय सिनकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, बंडू येवले आदींसह नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व शाळा, सामाजिक संस्था व नागरिक हे मोठ्या प्रमाणाने सहभागी झाले होते.

दिल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या आय.ए.एस. रूपा मिश्रा, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव व अमृत अभिजात यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला गौरविण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या नगर अभियंता वैशाली मठपती, नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे, खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर आणि शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी ह पुरस्कार स्वीकारला. या लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता शनिवारी 1 ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या निकालाची उत्सुकता शहरवासीयांना लागून राहिली असून त्या मुख्य स्पर्धेत देखील लोणावळा शहराला असेच नेत्रदीपक यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT