Latest

Kolhapur Politics : भाजपला कोल्हापुरात फुलवायचंय कमळ

Shambhuraj Pachindre

राम मंदिराच्या लोकार्पणानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार अशी सर्वत्र चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. कोल्हापुरात भाजपला कमळ फुलवायचं आहे. त्यासाठी चाचपणी सुरू आहे. भाजपकडे कोल्हापुरात उमेदवारही तयार आहे आणि शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठीचा आग्रह धरण्याची तयारीही आहे. भाजपची सगळी रणनीती त्या द़ृष्टीने सुरू आहे. (Kolhapur Politics)

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिवसेना शिंदे गटात आहेत. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्टवादी अजित पवार गट यांची सत्ता आहे. कोल्हापूरच्या दोन लोकसभेपैकी एक जागा भाजपने लढवायची ठरवली, तर ती कोणती असेल अशी चर्चा आहे. (Kolhapur Politics)

2014 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे भाजप-शिवसेना युती पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडून आले. हा अपवाद सोडला तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला आजवर यश मिळालेले नाही. 1977 साली देशभर जनता दलाची लाट असताना आणि काँग्रेसचे पानीपत झाले असताना बाळासाहेब माने यांनी वादळात दिवा लावला आणि ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. आज त्यांचेच नातू धैर्यशील माने शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत.

कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्यात संघर्ष झाला होता. यात मुश्रीफ यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे समरजितसिंह घाटगे यांची मंडलिक यांना साथ होती. आता राजकारण बरेच बदलले आहे. मुश्रीफ, मंडलिक व घाटगे हे महायुतीचे नेते म्हणून एकाच व्यासपीठावर वावरतील. मात्र, राजकारणात व्यासपीठावर एकत्र येणे आणि प्रत्यक्ष मदत करणे यामध्ये जमीनआस्मानाचे अंतर असते. याचा अनुभव खासदार संजय मंडलिक यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत घेतलाच आहे. त्यांचे चिरंजीव आणि बहीण या दोघांचाही गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे सगळे बरोबर म्हणजे विजय असे समीकरण निदान कोल्हापूरच्या राजकारणात तरी लागू होत नाही. धनंजय महाडिक यांनीही 2019 च्या निवडणुकीत याचा अनुभव घेतला आहे. कोल्हापूरच्या या वैशिष्ट्यपूर्ण राजकीय पार्श्वभूमीमुळे भाजपचे अतिसावध नेते ताकही फुंकूनच पिणार यात शंका नाही.

संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाताना निश्चितच पुढच्या उमेदवारीचा आणि राजकीय ताकद देण्याचा शब्द नक्कीच घेतला असणार. त्याशिवाय एवढी मोठी जोखीम ते पत्करणारच नाहीत. भाजपची आग्रही भूमिका पाहता कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एका जागेवर कमळ चिन्ह घ्यावे लागेल असे दिसते. त्याचबरोबर कोल्हापुरात आपलाच उमेदवार असावा असा जो भाजपचा आग्रह आहे तो पाहता भाजपने उमेदवारांची तयारी केली आहे. (Kolhapur Politics)

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही लोकसभेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्याबाबत सहानुभूती असणारे बडे नेते आहेत. मात्र, घाटगे यांना कागल विधानसभेत कमळ फुलविण्याची इच्छा आहे. आता भाजप धनंजय महाडिक किंवा शौमिका महाडिक यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविणार की, मंडलिकांच्या हाती कमळ देणार हीच चर्चा आहे. उद्या कदाचित मंडलिक आणि माने या दोघांच्याही हाती कमळ आल्यास आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे.

महाडिक, मंडलिक यांना पराभवाचे शल्य

लोकसभेच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला, तर शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांची बहीण व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुष्मिता पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे पराभवाचे शल्य मंडलिक आणि महाडिक घराण्यात कायम आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT