Latest

केवळ दैव बलवत्तर म्हणून…! खोल दरीत पडूनही वाचला तरुणाचा जीव

अमृता चौगुले

लोणावळा : रात्रीच्या अंधारात पाय घसरून खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील खोल दरीत पडलेल्या एका युवकाला बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. रात्रीच्या अंधारात करण्यात आलेल्या या रेस्क्यूमुळे सदर युवकाचे प्राण वाचले असून तो सुखरूप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. रात्री 11 वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन पुढील 3 तासाने म्हणजे मध्यरात्री 2 वाजता संपले. हरिश्चंद्र मंडल ( वय 25 वर्ष,  मूळ रा. ओरिसा, सध्या गोवा) असे या युवकाचे नाव आहे.

हरिश्चंद्र हा पर्यटनासाठी आणि खास करून ट्रेकिंगसाठी गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करत आहे. गुरुवारी तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंग साठी आला होता. खंडाळ्यातील वाघजई मंदिर पाठीमागे मंकीहिल भागातील डोंगरात फिरत असताना तो रस्ता चुकला आणि संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पाय घसरून सुमारे 200 फूट खोल दरीमध्ये पडला.

अंधार पडलेला असल्याने त्याला काही सुचेना, अखेर त्याने त्या ठिकाणाहून त्याने तो ज्या रिक्षा मधून घाटात फिरण्यासाठी आला होता त्या रीक्षा चालकाशी संपर्क केला आणि आपल्याला मदतीची गरज आहे असे सांगितले. रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला.

शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळ्याचे दोन सदस्य रोपच्या सहाय्याने खाली उतरले, मात्र त्यांना हरिश्चंद्र मंडलचा अंधारात काही ट्रेस लागत नव्हता आणि तो देखील घाबरलेला होता त्यामुळे कोणाच्याही हाकेला तो प्रतिसाद देत नव्हता. तरी देखील खाली उतरलेल्या दोन मेंबर्सनी त्याला शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. अखेर काही वेळाने हरिश्चंद्र मंडल मिळून आला. सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप सुरक्षित स्थळी आणून एनर्जी ड्रिंक आणि थोडं खायला दिलं. त्यानंतर त्याला लोणावळा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT