Latest

#fixing : राजस्थान-गुजरात फायनल होती ‘फिक्स’?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : #fixing : आयपीएल २०२२ चा अंतिम सामना राजस्थान आणि गुजरात यांच्यात खेळला गेला, जो हार्दिकच्या संघाने जिंकला. पण हा सामना संपताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि एका विशिष्ट शब्दाचा ट्रेंड सुरू झाला आणि तो होता फिक्सिंग (Fixing).

अंतिम सामना रोमहर्षक होता तसेच सर्व संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीच्या बाबतीतही हा आयपीएलचा हंगाम अतिशय नेत्रदीपक ठरला. पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सने केवळ अंतिम फेरी गाठली नाही तर ही ट्रॉफीही आपल्या नावावर केली. टायटन्सच्या प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना खूप खास राहिला. (#fixing)

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सला (RR) पराभवाचा सामना करताना निराश होऊन उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. या सामन्यातील राजस्थानच्या परफॉर्मन्सवर चाहते फारसे खूश नाहियेत. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूला धारेवर धरत सडकून टीका केली आहे. अनेक युजर्स RR वर फिक्सिंगचा आरोप केला आहे. (#fixing)

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या गुजरातबद्दल बोलायचे झाल्यास या संघाने लीगमधील सर्वाधिक सामने धावसंख्या चेस करून जिंकले आहेत. त्यांनी ९ पैकी आठ सामने जिंकले अशाच पद्धतीने जिंकले आहेत. तर एक गमावला आहे. अशा परिस्थितीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्याचा निर्णयही चुकीचा ठरला आणि संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. RR ने गुजरातसमोर विजयासाठी १३० धावांचीच माफक धावसंख्या उभारता आली. त्यामुळे नाणेफेकीनंतर चाहते चांगलेच संतापले.

या पराभवानंतर राजस्थानचा संघ ट्रोल तर होत आहे, पण त्याचबरोबर पिंक आर्मीवर फिक्सिंगचा गंभीर आरोपही केला जात आहे. सोशल मीडियावर #fixing हा ट्रेंड सुरू असून अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत. ट्विटरवर एका युझरने, राजस्थानने टॉस जिंकूनही फलंदाजी घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन सामन्यांत प्रथम गोलंदाजी करून सामने जिंकले, तरीही फायनलामध्ये प्रथम फलंदाजी का असा सवाल उपस्थित करत राजस्थानवर फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर एका युझरने, राजस्थान विरूद्ध गुजरात टायटन्सचा सामना फिक्स होता, असे म्हटले आहे. शिवाय अजून एका युझरने, फिक्सिंग असा हॅशटॅग वापरत राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारला आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात, जोस बटलर राजस्थानसाठी चमकदार फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर संघाचे उर्वरित फलंदाज काहीही करू शकले नाहीत आणि संघाने केवळ १३० धावा केल्या. अंतिम सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने गोलंदाजीद्वारे प्रतिस्पर्धी राजस्थानवर वर्चस्व गाजवले. या महत्त्वाच्या सामन्यात त्याने ३ बळी घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

राजस्थानचा संघ पराभूत झाला असला तरी पर्पल आणि ऑरेंज कॅप्सवर राजस्थानच्या खेळाडूंनी नाव कोरले. युजवेंद्र चहलने पर्पल कॅप तर ऑरेंज कॅप बटलरकडे गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT