Latest

पर्यावरणस्नेही शेतीसाठी नावीन्यपूर्ण नॅनो खते

Arun Patil

देशातील 1.4 अब्ज लोकसंख्येच्या भरणपोषणाच्या द़ृष्टीने, अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटकांमध्ये खते या घटकाचा समावेश होतो. गेल्या 9 वर्षांतील आपल्या प्रयत्नामुळे नायट्रोजनचा (एन) प्रमुख स्रोत असलेल्या युरियाचे उत्पादन वाढून 283.74 लाख टन प्रतिवर्ष इतके झाले आहे. 2013-14 मध्ये केवळ 207.54 लाख टन युरिया उत्पादन झाले होते. त्यात आता मोठी वाढ झाली आहे, तसेच सरकारी आणि खासगी क्षेत्रांसह एकूणच खत निर्मिती उद्योग फॉस्फेट आणि पोटॅश या महत्त्वाच्या अन्य पोषकद्रव्यांचा वापर वाढवण्यासाठीही चालना दिली जात आहे.

शाश्वत शेतीसाठी एनपीके खतांचा समतोल वापर आवश्यक आहे. मात्र, पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी खतांचा अतिरेकी आणि असमतोल वापर केल्यामुळे मातीची सुपीकता, मृदा तसेच जल संवर्धनासारखे महत्त्वाचे घटक धोक्यात येत आहेत. परिणामी, भूमी अधिकाधिक प्रमाणात पोषक द्रव्यांची भुकेली आणि पाण्यासाठी तहानलेली राहते आहे आणि मातीच्या सुपीकता विषयक स्थितीवरून ते स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा स्थितीत, खतांचा अधिक कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाली. अशावेळी या समस्येवर उत्तर म्हणून आणि पर्यावरणावर किमान परिणाम होऊ देऊन, कच्च्या मालाची कार्यक्षमता वाढवून कमी साहित्यासह अधिक प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाबाबत जाहीर केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेऊन भारतीय वैज्ञानिक तसेच अभियंत्यांनी, देशात स्वदेशी पद्धतीने प्रथमच विकसित केलेले नॅनो खत म्हणून नॅनो युरिया (द्रवरूप) तयार केला आहे.

केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या नॅनो कृषी सामग्रीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार सखोल चाचण्या केल्यानंतर तसेच जैवकार्यक्षमता आणि जैव सुरक्षा चाचणीविषयक कठोर नियमांची पूर्तता केल्यानंतर 2021 मध्ये खते नियंत्रण अधिनियमांतर्गत नॅनो युरिया अधिसूचित केला आहे. कायमस्वरूपी तत्त्वावर देशाची अन्न तसेच पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अमृत काळात, आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांच्या अंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांचे हे उत्तम उदाहरण आहे. आतापर्यंत गुजरातमधील काटोलमध्ये, उत्तर प्रदेशात फुलपूर आणि ओनला या ठिकाणी प्रतिवर्ष 17 कोटी बाटल्यांची निर्मिती क्षमता असलेले नॅनो युरिया निर्मिती कारखाने उभारले आहेत. 2025 पर्यंत नांगल, ट्रॉम्बे, बंगळूर, देवगड, गुवाहाटी आणि अन्य अनेक ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नॅनो युरियानिर्मिती कारखान्यांचे काम पूर्ण होईल आणि त्यामुळे देशातील एकूण नॅनो युरिया निर्मिती क्षमता प्रतिवर्ष 44 कोटी बाटल्या इतकी होईल. हे प्रमाण सध्या वापरात असलेल्या 195 लाख टन पारंपरिक युरियाइतके आहे. नॅनो युरियाची किंमत युरिया खताच्या पिशवीपेक्षा 16 टक्के कमी आहे, तसेच या प्रकारचा युरिया शेतकर्‍यांना त्यांच्या शेतापर्यंत वाहून नेणे सोपे आहे. वाहतूक आणि साठवण खर्चाच्या द़ृष्टीनेही नॅनो युरिया अधिक लाभदायक आहे.

पारंपरिक युरिया उत्पादन कारखान्यापेक्षा भांडवली व्यय, ऊर्जेचा वापर आणि कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन यांच्या बाबतीत नॅनो युरियानिर्मिती कारखाना अधिक फायदेशीर आहे. द्रवरूप नॅनो युरियामध्ये अधिक उच्च पोषणमूल्ये वापर क्षमता असते आणि या प्रकारच्या युरियाचा स्वीकार केल्यामुळे कृषी उत्पादकता, पिकाचा दर्जा, शेतकर्‍यांचा नफा यांच्यात सुधारणा होण्यासह माती, पाणी तसेच वायू यांच्या प्रदूषणाचे प्रमाण वाहतूक आणि साठवण खर्च आदी कमी होतात. 2021 च्या खरीप हंगामात आयसीएआरने 20 ठिकाणी नॅनो युरियाच्या वापराबाबत तांदूळ, मका, नाचणी, बाजरी तसेच आले या पिकांच्या लागवड प्रक्रियेत क्षेत्रीय प्रयोग केले असता पिकांपासून मिळणार्‍या उत्पन्नात 3 ते 8 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि शेतकर्‍यांच्या खर्चात 25-50 टक्क्यांची बचत झाली.

गेल्या तीन हंगामांमध्ये देशातील 192 लाख शेतकर्‍यांनी पारंपरिक युरियाच्या मात्रेला पर्याय म्हणून एकंदर दीडशे लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी द्रवरूप नॅनो युरियाच्या 6.5 कोटी बाटल्या (प्रत्येकी 500 मिली) वापरल्या. नॅनो युरियाचा वापर केल्यानंतर शेतकर्‍यांच्या पिकांच्या स्तरावरही उत्साहवर्धक परिणाम बघायला मिळाले. 2021-22 च्या तुलनेत 2022- 23 मध्ये नॅनो युरियाची विक्री 55 टक्क्यांनी वाढली, तर पारंपरिक युरियाच्या विक्रीत चार टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. पंजाब, केरळ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि आसाम या भागातील शेतकर्‍यांकडून होणार्‍या पारंपरिक युरियाच्या वापरात वर्ष 2022-23 मध्ये लक्षणीय घट दिसून आली 2021-22 च्या तुलनेत. 2022-23 मध्ये देशातील एकूण 189 जिल्ह्यांमध्ये पारंपरिक युरियाच्या वापरात घट झाली. त्यापैकी 16 राज्यांतील 130 जिल्ह्यांमध्ये पारंपरिक युरियाचा वापर सरासरी 12 टक्क्यांनी घसरलेला दिसला, तर नॅनो युरियाच्या वापरात 76 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

कृषी क्षेत्रातील वापरासाठी नुकतेच समाविष्ट केलेले नॅनो डीएपी हे नॅनो खत म्हणजे पिकांच्या पोषणविषयक शिरपेचात रोवण्यात आलेला आणखी एक नवा तुरा आहे, ज्याच्यामुळे पारंपरिक डीएपीचा वापर कमी होणार असून पर्यायाने या खताच्या आयातीचे प्रमाणही कमी होईल. नॅनो एनपीके, नॅनो झिंक, नॅनो कॉपर, नॅनो बोरॉन, नॅनो सल्फर आदी खतांच्या विकासाच्या दिशेने खते क्षेत्रात होत असलेले अधिक संशोधन पर्यावरणस्नेही शाश्वत शेती शक्य करण्याच्या दिशेने खात्रीपूर्वक वाटचाल करण्यात मदत करेल. पर्यायी खतांच्या वापराला प्रोत्साहन आणि रासायनिक खतांचा समतोल वापराच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या भूमातेचे पुनर्भरण, त्यासंदर्भातील जागृती, पोषण आणि उद्धारविषयक कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यातही नॅनो खतांचा वापर उपयुक्त ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT