Latest

संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम इंदापूर शहरातच ठेवा; तहसिलदारांना दिले नागरिकांनी निवेदन

अमृता चौगुले

इंदापूर: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर शहरात २ व ३ जुलै रोजी मुक्कामी येत आहे. शहरातील पालखी मुक्काम परंपरागत श्री. नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी ठेवावा यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून सोमवारी २० जून रोजी शहरातील सिद्धेश्वर मंदिरापासून पायी भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात इंदापूरकरांनी प्रशासकीय भवनापर्यंत पायी वारी करत तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन दिले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर शहरातील नवीन प्रस्तावित मुक्कामी तळ हे शहराबाहेर केल्याने सर्व शहरवासीय नाराज व दुःखी झाले आहेत. गेल्या २०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीची परंपरा असलेले इंदापूर शहरातील मुक्कामाचे स्थळ बदलल्याने सर्वत्र असंतोष पसरत चालला आहे. हा पालखी सोहळा म्हणजे इंदापूरकरांचा अभिमानाचा उत्सव आहे. पालखीच्या मुक्कामाचे दोन दिवस इंदापूरकरांसाठी यात्रा असते. प्रशासन व देहु संस्थांनच्या गैरसमजातून आणि हेकेखोरपणामुळे बदललेल्या मुक्काम तळामुळे वारकऱ्यांना व प्रशासनाला सुद्धा अनेक गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

प्रशासन व देहू संस्थांनच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. तसेच गुरूवारी २३ जून रोजी इंदापूर तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण देखील करण्यात येणार आहे. रविवारी २६ जूनला तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय बदलण्यात आला नाही तर पालखी मुक्कामाच्या दिवशीच २ आणि ३ जुलै रोजी दोन दिवस इंदापूर शहर बंद ठेवण्यात येणार असल्याचे या निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT