Latest

शिक्षणानेच युवा पिढीला जगाची दारे उघडली : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

चंदगड, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हीच खरी संपत्ती असून शिक्षणानेच भारतातील युवा पिढीला जगाची दारे उघडली आहेत. ज्ञानाच्या बळावरच जगभरातील प्रमुख संस्थांचे नेतृत्व करीत या पिढीने देशाचा झेंडा फडकावला आहे. शिक्षणानेच जीवनातील सर्व प्रकारच्या सीमा ओलांडून नवनवी शिखरे पादाक्रांत करता येतात. त्यानेच स्वत:चे आयुष्य घडते. आपला समाज आणि राष्ट्राचीही प्रगती साधता येते, असे प्रतिपादन दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शुक्रवारी येथे केले.

चंदगडमधील खेडूत शिक्षण मंडळाच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. आर. पाटील होते. प्रारंभी डॉ. जाधव यांचे धनगरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. इमारतीच्या कोनशीला अनावरण आणि इमारतीचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते, तर आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते प्राचार्य पी. आर. पाटील हॉलचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य पी. आर. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.

चंदगडसारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे महाकठीण काम खेडूत शिक्षण संस्थेने केले असून शिक्षणाची ही गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवली आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही आणि देशाला उज्ज्वल भवितव्य नाही. संपत्तीपेक्षा शिक्षण हे महत्त्वाचे आहे. संपत्ती कधीही नष्ट होऊ शकते; मात्र मिळवलेले शिक्षण मरेपर्यंत पुरते, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, पुस्तकांचे पारायण करा. त्याशिवाय अधिकारवाणीने बोलता किंवा लिहिता येत नाही. येथील संस्कृतीचा आणि शिक्षणाचा देशाच्या जडणघडणीत फार मोठा मोलाचा वाटा आहे. जगातल्या मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये भारतीय लोक आहेत; मात्र शिक्षणासाठी अजूनही आपल्याकडे फार मोठा निधी खर्ची पडत नाही. शिक्षण संस्थांना आर्थिक मदत मिळाल्याशिवाय संस्था टिकू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांना सल्ला देताना डॉ. जाधव म्हणाले, तुम्ही विद्यार्थी नशीबवान आहात. ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान याचा विस्फोट तसेच विज्ञानामुळे शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. आयुष्यात शेवटपर्यंत विद्यार्थी बनून राहिल्यास तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळेल. शिक्षण ही सगळ्यात मौलिक संपत्ती आहे; पण त्यासाठी शिकण्याची वृत्ती अंगी बाणवावी लागेल.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना दरमहा 176 कोटी रुपयाचे वेतन मिळते, असे सोदाहरण सांगत अनेक भारतीय जगभरातील आघाडीच्या प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करत असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. 2030 मध्ये भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड वाढणार असून तो जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असेल. देशाच्या लोकसंख्येपैकी 65 टक्के नागरिक 30 वर्षाच्या आतील वर्षांचे असतील. ही युवा शक्ती शिक्षणाच्या बळावरच बौद्धिक संपदेचा वारसा समर्थपणे चालवू शकेल असा विश्वासही डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना 90 वर्षीय अ‍ॅड. पाटील म्हणाले, आमच्या कॉलेजच्या निमित्ताने डॉ. प्रतापसिंह जाधव हे चंदगडसारख्या खेडेगावात आले, हाच आमच्यासाठी सुवर्ण दिवस असून त्यांचे कार्य सर्वांना प्रेरित करणारे आहे. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एस. आर. पाटील, प्राचार्य पी. आर. पाटील, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, नगराध्यक्षा प्राची काणेकर, प्रा. आर. पी. पाटील, एल. डी. कांबळे, कानोबा माळवे, एम. एम. तुपारे, अशोकराव पाटील, जे. एल. पाटील गुरुजी, गोपाळ बोकडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. एन. एस. मासाळ यांनी आभार मानले.

डॉ. जाधवच माझ्या लिखाणाची ऊर्जा

बेळगावचे प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, आजवर मी विपुल लिखाण केले असले, तरी त्याची खरी प्रेरणा डॉ. प्रतापसिंह जाधव आहेत. त्यांनी सुरुवातीला मला जाणीवपूर्वक बोलवून तुम्ही लिहिते व्हा, असे सांगून 'पुढारी'चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे आतापर्यंतचे मी लिखाण करू शकलो. डॉ. जाधव हे माझ्यातील लेखकाची ऊर्जा आहेत.

डॉ. जाधव यांच्यामुळे मी मंत्री : भरमू पाटील

या कार्यक्रमामध्ये माजी राज्यमंत्री भरमू पाटील म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच आपल्याला 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्रिपद मिळाले होते. आयुष्यात मी डॉ. जाधव यांना गुरू मानतो, असे पाटील यांनी सांगितल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT