Latest

नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांच्या जोडीला आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या जोडीला साठ 'ट्रॅफिक वॉर्डन' नेमण्यात येणार आहेत. या वॉर्डनची यादी पोलिस आयुक्तालयाने तयार केली आहे. या वॉर्डनच्या नावांची शिफारस आणि निधी मंजुरीसाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वाहतूक समितीची मंजुरी येताच ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले जाणार आहेत.

शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट हाेत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करीत आहेत. मात्र अपुरे मनुष्यबळ, बेशिस्त चालकांची वाढती संख्या यामुळे ही समस्या सुटण्यास अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांच्या जोडीला ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. तत्कालीन वाहतूक पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांनी याबाबत कार्यवाही केली. ट्रॅफिक वॉर्डनसाठी इच्छुक असलेल्या शंभरपेक्षा जास्त अर्जांमधून निकषांनुसार साठ जणांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार वाहतूक उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी ६० जणांच्या यादीसह महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेकडून ट्रॅफिक वॉर्डनसाठी गणवेश आणि मानधनासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर संबंधितांना गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांसोबत नियुक्त केले जाईल.

तीनशे पोलिसांवर वाहतूक नियोजनाची जबाबदारी

वाहतूक पोलिसांकडे तीनशे अधिकारी अंमलदारांचे बळ आहे. मात्र, ते अपुरे पडत असल्याचे वारंवार जाणवते. शहरात २ हजार २०० किमी लांबीचे रस्ते असून, त्यांवर अवघ्या ३०० पोलिसांकडून वाहतूक नियोजन केले जाते. त्यामुळे शहरात प्रत्येक सात किलोमीटर अंतरासाठी एक वाहतूक अंमलदार असून, त्याच्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासह बेशिस्त चालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे.

वाहतूक पोलिस अंमलदारांसोबत ट्रॅफिक वॉर्डन काम करतील. नेमणुकीच्या वेळी संबंधितांना प्रशिक्षण व सूचना देण्यात येतील. वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या ठिकाणी ठराविक वेळेसाठी नेमणूक केली जाईल. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

– चंद्रकांत खांडवी, पोलिस उपआयुक्त, वाहतूक विभाग

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT