Latest

Kamal Nath : कमलनाथ यांची भाजप प्रवेशाची कोंडी वाढली, कारण…

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Kamal Nath : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबतचा तिढा आणखी वाढला आहे. कमलनाथ यांनी घातलेल्या अटी भाजप नेतृत्वाने स्पष्ट शब्दात नाकारल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तर, भाजपशी वाढत्या निकटतेमुळे काँग्रेसने आता कमलनाथ यांची मनधरणी करण्याची गरज नाही, असा पवित्रा घेतल्याचे समजते.

काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याची दोन दिवसांपासून चर्चा रंगली होती. खासदार नकुलनाथ यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलमधील व्यक्तिगत तपशीलांमधून काँग्रेस हा शब्द वगळल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आले होते. दोघेही जण कालपासून दिल्लीत असून कमलनाथ यांनी भाजपप्रवेशाबद्दल थेट बोलण्याचे टाळले होते. मात्र याबाबत नकारही दिला नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी वाढली होती. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातच्या समाप्तीनंतरच कमलनाथ यांचा पक्ष प्रवेश होईल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता भाजपमध्ये येण्यासाठी कमलनाथ काही अटी घालत आहेत, त्या पक्षाला मान्य नाहीत. त्यामुळे कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, काँग्रेस नेतृत्वाने कमलनाथ यांना रोखण्याचे किंवा त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न पूर्णपणे थांबविले आहे. एवढेच नव्हे तर कमलनाथ भाजपमध्ये सामील झाले नाहीत तरीही काँग्रेसतर्फे त्यांना अथवा त्यांचे पुत्र व छिंदवाड्याचे विद्यमान खासदार नकुल नाथ यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, असे संकेतही काँग्रेसमधून देण्यात आले आहेत.

गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या कमलनाथ यांनी भाजपशी संधान बांधल्यामुळे माजी अध्यक्षा सोनिया गांधी कमलनाथ यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. कमलनाथ यांना थांबविण्याचा आता कोणताही प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आदेशही सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना दिल्याचे कळते.

दरम्यान, खासदार नकुलनाथ यांना सोबत घेण्यास भाजप नेतृत्व उत्सुक असले तरी लोकसभा निवडणुकीपर्यंत कमलनाथ यांना पक्षात सामावून घेण्यास पक्ष नेतृत्व तयार नसल्याचे समजते. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील कथित सहभागाचा आरोप कमलनाथ यांच्यावर आहे. असे असताना त्यांचा संभाव्य पक्षप्रवेश शीख समाजाला दिल्लीत, पंजाबमध्ये नाराज करणारा ठरेल म्हणूनही कमलनाथ यांना सोबत घेण्याबाबत भाजपमध्ये द्विधावस्था असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, १९८४ च्या दंगलीचा कलंक असूनही कमलनाथ सातत्याने खासदार झाले आणि मंत्रीपदी, मुख्यमंत्रीपदी राहिले. यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले नव्हते तर भाजपचे नुकसान कसे होईल असाही दुसरा युक्तिवाद भाजपमधून पुढे येत आहे. मात्र, कमलनाथ यांच्याबाबत भाजपने अद्याप कोणताही निर्णय केलेला नाही. त्यामुळे कमलनाथ यांची कोंडी वाढल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT