Latest

UPSC Exam Result: पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याच्या मुलाची युपीएससी परीक्षेत बाजी: डॉ. अंकेत जाधव ३९५ व्या रँकने उत्तीर्ण

अविनाश सुतार

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील शिवणी या ग्रामीण भागातील डॉ. अंकेत जाधव याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय तसेच रुग्णांची सेवा करीत त्याने मिळविलेले यश हिंगोली जिल्ह्याची मान उंचावणारे ठरले आहे. UPSC Exam Result

कळमनुरी तालुक्यातील शिवणी या खेडेगावात जन्म झालेल्या डॉ. अंकेत यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयात झाले. त्यांचे आई, वडील शेती करतात. मात्र, एकुलता एक मुलगा हुशार असल्याने त्यांनी अधिकारी व्हावे, असे स्वप्न त्याच्या आई, वडिलांनी पाहिले. त्यामुळे पोटाला चिमटा घेऊन त्यांनी डॉ. अंकेत याला शिक्षण दिले. त्यानंतर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांने पुणे येथे एम. बी. बी. एस.चे शिक्षण 2022 मध्ये पूर्ण केले. मागील काही दिवसांपासून तो कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. UPSC Exam Result

वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी सारख्या ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करीत त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. ऑनलाईन अभ्यास करून त्याने मे 2023 मध्ये झालेली पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. आता यश टप्प्यात आले हे लक्षात घेऊन त्याने दिवस रात्र एक करुन मुख्य परिक्षेचा अभ्यास केला. अन् सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत यश मिळविले. मुलाखतीची तयारी करून जानेवारी 2024 मध्ये मुलाखत दिली. मंगळवारी (दि.१६) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्याने 395 वी रँक मिळविली. निकाल पाहताच डॉ. अंकेतसह त्याच्या कुटुंबियांना आकाश ठेंगणे झाले.  कुठल्याही शिकवणी शिवाय त्याने मिळविलेले हे यश तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

तरुणांनो सकारात्मक दृष्टीकोन ठेवा:  डॉ. अंकेत जाधव

तरुणांनी कुठल्याही परीक्षेसाठी आधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम केलेल्यास यश मिळविणे कठीण नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT