Latest

Hijab karnataka : कर्नाटकातील हिजाब वाद पोहोचला लोकसभेत

backup backup

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुरखा विरुद्ध भगवा शेला असा वाद निर्माण झाला असतानाच या वादाची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होत असून लोकसभेतही याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारने मध्यस्थी करून तोडगा काढण्याची मागणी काही काँग्रेस खासदारांनी केली आहे. (Hijab karnataka)

डीएमके पक्षाचे खासदार डॉ. एस. सेंथीलकुमार, काँग्रेस नेते शशी थरूर, एआयएडीएमचे इम्तियाज जलील यांच्यासह इतर खासदारांनी कर्नाटकातील हिजाबविरुद्ध भगव्या शेल्याचा वादात मध्यस्थी करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने हा वाद तातडीने मिटवावा. राज्य सरकारची भूमिका योग्य नाही. धार्मिक स्वातंत्र्याविषयी सरकारी महाविद्यालयांचे वर्तन आक्षेपार्ह आहे, असे खासदारांनी मत मांडले.

Hijab karnataka : गुलबर्गा महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी बुरखा घालून निदर्शने

दरम्यान, शनिवारी गुलबर्गा महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी बुरखा घालून निदर्शने केली. आमदार कनीझ फातिमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी गुलबर्गा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. महाविद्यालयात बुरखा परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी आवारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

उडुपी येथे काही विद्यार्थिनींनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण प्राचार्यांनी त्यांना अडवले. विद्यार्थिनींनी त्यांतर गेटनजीक निदर्शने केली. उडुपीतील कुंदापूर सरकारी कॉलेजमध्ये शुक्रवारी 20 विद्यार्थिनींनी हिजाबसह गेटनजीक आंदोलन केले. त्यांनाही महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.

विद्यार्थी आक्रमक बनल्याने परिसरात तणाव

विद्यार्थी आक्रमक बनल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळे शनिवारी महाविद्यालयाला सुट्टी घोषित करण्यात आली. हा वाद उडुपीतील गल्लोगल्ली उफाळला आहे. विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. दरम्यान, पालकांच्या एका गटाने महाविद्यालयात जाऊन बुरखा धारण करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली.

गेल्या तीन आठवड्यांपासून हा वाद सुरू आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने अनेकदा समेटाचा प्रयत्न केला तरी त्यांना अपयश आले. बुरखा धारण करणे धार्मिक धोरण आहे. शिवाय हा आपला हक्क असल्याचा हट्ट विद्यार्थिनींनी धरला आहे. परिणामी, हा वाद राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.

हा रा. स्व. संघाचा अजेंडा

बुरख्याच्या नावाखाली मुस्लिम मुलींना शिक्षण नाकारण्याचा मुख्य अजेंडा संघ परिवाराचा असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला. लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले जात आहे. असे काम करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देत आहेत. अशावेळी केवळ बुरखा धारण केल्याच्या कारणावरून मुलींना शिक्षणापासून दूर लोटले जात आहे.

मुलींना मशिदीत प्रवेश द्या

विद्यार्थिनींना हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी काही नेते करत आहेत. त्यांनी मुली आणि महिलांना मशिदीत प्रवेश देण्यासाठी आंदोलन करावे, असे आव्हान ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी दिले. महाविद्यालयात गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तरीही हिजाबचे समर्थन केले जात आहे. त्या नेत्यांनी आता मुली आणि महिलांना मशिदीत प्रवेशाच्या परवानगीसाठी देशव्यापी आंदोलन छेडावे, असे ते म्हणाले.

32 वर्षांत पहिल्यांदाच

गेल्या 32 वर्षांपासून उडुपीतील महाविद्यालय कार्यरत आहेत. तेथे गणवेशाचा नियम आहे. विद्यार्थिनी वर्गात प्रवेश केल्यानंतर बुरखा काढतात. पण यंदा प्रथमच हा वाद निर्माण झाला आहे. शंभरपेक्षा अधिक विद्यार्थिनींनी बुरखा धारण करूनच वर्गात बसण्याचा हट्ट धरला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT