Latest

पुणे : शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर रंगले ‘मानापमान’नाट्य ; संभाजीराजे छत्रपती संतापले

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर शहर व किल्ले शिवनेरी प्रचंड उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा होत असताना शिवभक्तांना किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमासाठी सोडण्यात न आल्याने माजी खासदार संभाजी छत्रपती चांगलेच संतापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी संभाजीराजे आपले समर्थक व शिवभक्तांसह जोरदार घोषणाबाजी करत पोहचले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संभाजीराजेंना व्यासपीठावर येण्याची वारंवार विनंती केली. परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून कोणी रोखत असेल तर कदापिही सहन करणार नाही सांगत संभाजीराजेंनी व्यासपीठावर जाण्यास नकार दिला. या गोंधळातच कार्यक्रम उरकण्यात आला. किल्ले शिवनेरीवर रंगलेल्या मानापमान नाट्यामुळे शिवजयंती सोहळ्याला मात्र गालबोट लागले.

किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार अतुल बेनके, आमदार प्रवीण दरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवजन्म सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडावरील सभास्थळी आले. याचवेळी शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी काही व्हिआयपींना पासेस देऊन सोडण्यात येत आहे आणि शिवभक्तांना मात्र रोखून धरण्यात आलं आहे, अशी तक्रार शिवभक्तांनी छत्रपती संभाजी यांच्याकडे केली.

हा प्रकार पाहून संभाजी छत्रपती प्रचंड संतापले आणि थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वारंवार संभाजीराजेंना व्यासपीठावर येण्याची विनंती करत होते. परंतु शिवभक्त जोरदार घोषणाबाजी करत राहिले. पुरातत्व विभागाने सांगितलं की महाराजांचा जन्म झाला तिथं जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? हा असा कुठला नियम आहे? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. किल्ले रायगडावर हेलिकॉप्टरला परवानगी नाही तर शिवनेरीवर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत यावे अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी केली. यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंची समजूत काढली व यापुढे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन देखील दिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात 'मी संभाजीराजे व सर्व शिवभक्तांच्या भावनांची मी नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचंच आहे. आपण शिवरायांचे मावळे असून, तुमच्यापैकीच एक मावळा आता राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचारानेच या राज्याचा कारभार सुरू आहे. पुढच्या वर्षी सर्वांना विश्वासात घेऊन सर्व नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.'

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त संपूर्ण राज्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर आपल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे कुणाचीही अडवणूक होणार नाही यांची सरकार नक्की काळजी घेईन. संभाजीराजेंच्या सर्व मागण्यांची राज्य सरकार योग्य दखल घेईल. राज्यातील हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारावर स्थापन झाले आहे, त्यामुळेच शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सत्तेत आल्यानंतर त्वरीत राज्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधी पैकी 3 टक्के निधी दर वर्षी राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धन व विकासासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.

संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रमाणे रायगड विकासाचे काम सुरू आहे, त्या प्रमाणेच राज्यातील अन्य गडकिल्ल्यांचा विकास करण्यात येईल, असे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमचे सरकार सर्वसामान्य, आठरापगड जातीधर्माचे व बाराबलुतेदारांचे सरकार आहे. त्यामुळेच आमचे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. आम्ही सर्व छत्रपती शिवाजीमहाराजांचे सेवक म्हणूनच काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या गोंधळातच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT