Latest

Good News : गुळवेल कोरोनावर प्रभावी; सीडॅकमधील शास्त्रज्ञांचा दावा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तेसवा

'रेमडिसिव्हिर हे इंजेक्शन मधुमेहावर गुणकारी आहे माहीत होते. मात्र, ते कोविडवर प्रभावी असल्याचा शोध सी-डॅकमध्ये लागला; तसेच रेमडिसिव्हिर इतकेच आपले आयुर्वेदातील शतावरी आणि गुळवेल प्रभावी आहे,' असे मत सी-डॅकमधील मेडिकल सायन्स विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या शोधनिबंधाची दखल लंडनच्या रॉयल केमिकल सोसायटीने एप्रिल 2020 मध्येच घेतली आहे.

सीडॅकचे अैाषधी व रसायन शास्त्रातही काम

पाषाण येथील सी-डॅक अर्थात प्रगत संगणन विकास केंद्रात बुधवारी 38 व्या वर्धापनदिना निमित्ताने पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या संस्थेचे महासंचालक कर्नल ए. के. नाथ यांनी आजवर तेथील शास्त्रज्ञांनी संगणक क्षेत्रात केलेल्या सर्वोच्च कामगिरीचा आढावा गेतला. यावेळी, 'ही संस्था फक्त महासंगणक, सॉफ्टवेअर, हार्डवेअर अशा विषयांवर काम करते. कोविडशी तुमचा कसा संबंध? तुमच्याकडे औषधी किंवा रसायन शास्त्रज्ञदेखील काम करतात काय?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी होय असे उत्तर देऊन सी-डॅकच्या मेडिकल सायन्स विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जोशी यांना बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी अस्खलित मराठीतच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

सी-डॅक आता औषधनिर्मिती करणार का? या प्रश्नावर डॉ. जोशी म्हणाले, 'आम्ही फक्त संशोधन करतो. या संशोधनामुळे अनेक कंपन्या पुढे आल्यात. लुपीन या कंपनीसोबत आमचे काम सुरू आहे. अनेक प्रकारच्या औषधीबाबत ते सल्ला घेत आहेत. यात क्लिनिकल ट्रायल महासंगणकावर प्रचंड वेगाने याचा फायदा होतो. त्यामुळे हे काम आम्ही करीत आहोत.' 'हे काम आधी का नाही सांगितले? लोकांना फायदा झाला असता? लोकांचा सी-डॅकवर विश्वास आहे,' यावर स्मितहास्य करीत डॉ. जोशी म्हणाले, 'आयुष मंत्रालयाने हे औषध सांगितलेले होते. त्यांचे आणि आयसीएमआरचे काम यात खूप मोठे योगदान आहे. आम्ही त्या काळात फक्त संशोधन करीत काही बाबी सुचवत होतो इतकेच…'

आयुर्वेद म्हणजे जादुटोणा नव्हे !

अवघ्या तीनच आठवड्यांत आम्ही सहा ते सात औषधी कोविडवर प्रभावी असल्याचे शोधले. यात प्रामुख्याने रेमिडिसिव्हिर ड्रग अ‍ॅलोपॅथीतून, तर शतावरी आणि गुळवेल हे तितकेच गुणकारी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे 19 एप्रिल 2020 रोजी आम्ही प्रथम ही माहिती शोधून काढली. त्याचा फायदाही झाला. त्यावर शोधनिबंध लिहिला, तो इंग्लडच्या रॉयल केमिकल सोसायटीने प्रसिद्धही केला. आपल्याकडे आयुर्वेदाला अजूनही न मानणारे आहेत. आयुर्वेदिक औषधी म्हणजे जादुटोणा मानणारेदेखील आहेत, पण या औषधांच्या क्लिनिकल ट्रायल जेव्हा आम्ही महासंगणकावर घेतल्या, तेव्हा थक्क झालो अन् आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी कबुली डॉ. जोशी यांनी दिली.

महासंगणकावर ड्रगची चाचणी

डॉ. जोशी म्हणाले, 'आम्हाला कुणीही हे काम सांगितले नाही. मात्र, देशासाठी आपण काहीतरी योगदान कोविडच्या काळात द्यावे या भावनेतून औषध प्रशासनाच्या प्रमाणित 3 हजार 500 ड्रगची चाचणी आम्ही आमच्या पुणे येथील प्रयोगशाळेत महासंगणकाच्या साहाय्याने घेतली. त्यात प्रोटीन तपासण्याचे काम सुरू होते. कारण कोरोनाचा विषाणू प्रोटीनपासून तयार झालेला असल्याने हे काम जिकिरीचे होते. महासंगणकावर सर्व अणू-रेणू अगदी त्यांच्या संरचनेसह वेगळे अन् स्पष्ट दिसतात. त्यामुळे औषधीचे पृथक्करण सोपे जाते.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT