Latest

गगन सोमनाचे खून प्रकरण : तप उलटले तरी तपास सुरुच

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : विद्यानगर, अनगोळमधील आठवर्षीय गगनच्या खून प्रकरणाला तप उलटले तरी तपास अद्याप लटकलेलाच आहे. 12 नोव्हेंबर 2010 रोजी त्याचा गळा चिरुन खून केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाला रविवारी (दि. 12) 13 वर्षे पूर्ण होतात. मारेकर्‍यांचा शोध घ्यावा यासाठी गगनचे वडील नरेश गेल्या 13 वर्षापासून पोलिस ठाण्याच्या पायर्‍या झिजवत आहेत.

घराच्या अंगणात खेळणार्‍या गगनचे अज्ञातांनी 10 नोव्हेंबर 2010 रोजी अपहरण केले. त्यानंतर दुसरे दिवशी त्यांच्याच परसातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. मारेकर्‍यांनी गळा चिरुन खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करुन घेत तत्कालीन पोलिस निरीक्षक दयानंद पवार यांनी तपास चालविला. मात्र, या प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांना अपयश आले. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांच्या कार्यकाळात घडलेल्या या खून प्रकरणाचा तपासच लागला नाही.

अनैतिक संबंध किंवा भानामतीच्या प्रकारातून गगनचा खून झाला असावा या संशयाने चौकशी करण्यात आली. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. पण काही उपयोग झाला नाही. टिळकवाडीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. पी. सरवगोळ यांनीही तपासासाठी जंग जंग पछाडले. पण, त्यांनाही अपयश आले. त्यामुळे, याप्रकरणी न्यायालयात सी रिपोर्ट दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पुन्हा हाती घेण्याची सूचना पोलिसांना केली. तरीसुद्धा या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. दरवर्षी गगनचे वडील नरेश 12 नोव्हेंबरला पोलिस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना भेटून आपली कैफियत मांडतात. आपल्या मुलाच्या मारेकर्‍यांना अटक झालेली नाही ही खंत त्यांना कायम सतावत आहे.

गगन सोमनाचे या बालकाच्या खून प्रकरणी न्यायालयात तात्कालिक सी रिपोर्ट दाखल करण्यात आला असला तरी प्रकरणाचा तपास सुरुच आहे. नरेश यांनी आपली भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार टिळकवाडीचे पोलिस निरीक्षक परशराम पुजारी यांना सूचना केली आहे.
– अरुणकुमार कोळ्ळूर, एसीपी खडेबाजार उपविभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT