Latest

नेवासा, श्रीरामपूरमध्ये वीज अंगावर पडून दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू

अमृता चौगुले

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने बुधवारी दाणादाण केली. त्यात बालाजी देडगाव येथे सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भास्कर तांबे यांच्या शेतामध्ये कांदा काढत असलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सविता राजू बर्फे (वय 42) असे त्यांचे नाव आहे. दुसर्‍या घटनेत अंमळनेर येथील एका शेतकर्‍याचा मृत्यू वीज पडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे वीज पडून महिलेसह दोघांचा मृत्यू झाला.

ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर कांदे काढणार्‍या महिला आडोशाला पळाल्या. त्या वेळी शेतातून कडेला जात असलेल्या सविता राजू बर्फे यांच्या अंगावर वीज पडली. रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सविता यांचे सासर पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, तालुक्यातील अंमळनेर येथे सायंकाळी सहाच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असलेल्या रावसाहेब भागाजी बोरूडे (वय 54) या शेतकर्‍याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस पाटील अनिल माकोणे यांनी दिली. मुकिंदपूर, खडका, चांदा आदी भागात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान केले. वादळाने शेतकर्‍यांची कांदा झाकण्यासाठी त्रेधातिरपीट उडाली होती.

चांदा परिसरात बुधवारी संध्याकाळी सहा वाजता वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस पडला. वाड्या-वस्त्यांवरील, तसेच चांदा बाजारतळावरील झाडे मोडून पडली. गावातील काही घरांचे पत्रे उडाली. गावातील दौलत विठ्ठल लाड अशोक विठ्ठल लाड गणीभाई तांबोळी तसेच बबन जावळे यांच्या घराचे पत्रे उडून एक किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. काही पत्रे पेठेतील विजेच्या तारेवर पडल्याने तारा तुटल्या. विजेचे खांब वाकले. ज्यांच्या घराचे पत्रे उडाले. हे कुटुंब अतिशय गरीब आहे. चांदा बाजार तळावर मोठे झाड पडल्याने दत्तात्रय रक्तटे यांची चहाची टपरी आणि संजय भगत यांचे इलेक्ट्रिक दुकानाचे नुकसान झाले.

भेर्डापूरला वीज पडून 2 ठार

श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने सायंकाळी धुमाकूळ घातला. भेर्डापूर परिसरात शेतात वीज अंगावर पडल्याने शेतकरी प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय 47) व अलका रामदास राऊत (वय 50) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. संगीता रवींद्र साळे व रवींद्र साळे हे दोघे या घटनेत गंभीर जखमी झाले. परिसरात झाडांचे, शेतीपिकांचे व दहा ते बारा घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT