Latest

Kolhapur Politics | मेव्हण्या-पाव्हण्यांचे ‘बिद्री’त का बिनसले?; ए.वाय., मंडलिक, आबिटकर, घाटगे, महाडिक एकत्र

दीपक दि. भांदिगरे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीच्या (ता. कागल) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडत राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीसोबत राहणार असल्याचे गुरुवारी (दि. 16) जाहीर केले. 'बिद्री'त निर्माण झालेली मक्तेदारी आणि शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याची घोषणा ए. वाय. पाटील यांच्यासह खा. संजय मंडलिक, खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आबिटकर, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. (Kolhapur Politics)

संबंधित बातम्या 

'बिद्री'च्या निवडणुकीवरून कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या-पाव्हण्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून आघाडी करण्यावरून मतभेद सुरू होते. त्यामुळे ए. वाय. पाटील सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरू होत्या. ए. वाय. यांनी विरोधी आघाडीच्या पॅनेलसोबत राहण्याचा निर्णय घोषित केल्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विरोधी आघाडीचे नेतृत्व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणार आहे.

मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आघाडी

'बिद्री'ची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आपण इच्छा बोलून दाखविली होती. कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे सर्वसमावेशक आघाडी व्हावी, अशी आपली प्रामाणिक इच्छा होती. परंतु, दुसर्‍या बाजूने प्रतिसाद न मिळाल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणे आम्हाला न शोभणारे होईल. त्यामुळे समविचारी एकत्र येऊन पॅनेल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले. त्याला ए. वाय. पाटील यांच्यासह सर्वांनी साथ दिली. 'बिद्री'त निर्माण झालेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व शेतकर्‍यांना न्याय देण्याकरिता तरुणांची, अनुभवी लोकांची चांगली आघाडी तयार होईल. माघारीनंतर शुक्रवारी उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे खा. संजय मंडलिक यांनी सांगितले.

पिक्चर अजून बाकी…

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी निवडणूक लढविणार आहे. ए. वाय. पाटील सोबत आल्यामुळे आम्हाला बळ मिळाले आहे. ही सुरुवात आहे. पुढील 24 तासांत आणखी काही घडामोडी घडणार असल्याने पिक्चर अजून बाकी आहे, असे शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले.

काही गोष्टी खटकल्याने बाहेर पडलो

ए. वाय. पाटील म्हणाले, कारखान्यात परिवर्तन व्हावे, कारभार चांगला व्हावा, प्रशासकीय बाबींमध्ये बदल व्हावा, या हेतूने तसेच कारखान्यात हीच आघाडी भविष्यात चांगले काम करू शकेल, असा विश्वास निर्माण झाल्याने आपण विरोधी आघाडीला पाठिंबा दिला आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार व मतदारसंघातील काही गोष्टी खटकल्याने आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पद किंवा संचालकांच्या जादा जागा, असा विषय नव्हता. यावेळी माजी आ. अमल महाडिक, बाबासाहेब पाटील, मारुतराव जाधव-तळाशीकर आदी उपस्थित होते.

घाटगे, मंडलिक एकत्र आल्याने परिवर्तन अटळ

'बिद्री'च्या निवडणुकीत 2005 मध्ये विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक एकत्र आले होते. त्यावेळी कारखान्यात परिवर्तन झाले होते. आता पुन्हा एकदा मंडलिक व घाटगे यांचे वारस एकत्र आल्यामुळे कारखान्यात परिवर्तन अटळ असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. (Kolhapur Politics)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT