Latest

Animal Smuglling : सांगलीतील गाढवांची चीनमध्ये तस्करी!

Arun Patil

सांगली, सचिन लाड : Animal Smuglling : सांगली, मिरजेसह जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. आंध्र प्रदेश हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे. औषध निर्मिती व उत्तेजना वाढवण्यासाठी गाढवांचा वापर केला जात आहे.

Animal Smuglling कष्टाळ, मेहनती व आपले काम निमूटपणे करणारा प्राणी म्हणून गाढवाची ओळख आहे. आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सीरियापर्यंत आणि उत्तर आफ्रिका खंडाच्या पूर्व तसेच उत्तर भागात गाढवे आढळतात. मानक, लघु, मॅमथ, बुरो त्यांच्या विविध प्रकारच्या दहा जाती आहेत. गवत आणि लहान झुडपे खाऊन ते उपजीविका करतात. 25 ते 45 वर्षे असे त्यांचे आयुष्यमान असते. पंधरा हजार रुपयांपासून ते तीस हजार रुपयापर्यंत गाढवाच्या किमती आहेत. पुणे जिल्ह्यातील जेजुरीतील यात्रेत गाढवांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. गुजरातमध्येही गाढवांचा मोठा बाजार भरतो. तेथूनच प्रामुख्याने गाढवे सांगली जिल्ह्यात येतात.

गाढवांचा व्यवसाय करून 15 ते 20 हजार कुटुंबांची आजही उपजीविका सुरू आहे. काहीजणांनी कर्ज काढून गाढवे विकत आणली आहेत. मात्र, गाढवांची चोरी होऊ लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशमधून पहिल्यांदा गाढव चोरीला जात असल्याच्या घटना समोर आल्या. त्यानंतर गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्रातूनही तस्करी सुरू झाली. सांगली जिल्हाही याला अपवाद राहिला नाही. पूर्वी जिल्ह्यात सुमारे 15 ते 20 हजार गाढवांची संख्या होती. हा आकडा आता चार हजारपर्यंत गेला असल्याचे काही गाढव मालकांनी सांगितले. तस्करी हेच मुख्य कारण असल्याने गाढवांची संख्या कमी झाली आहे. येथून गाढव चोरी करून थेट चीनमध्ये लाखो रुपये किमतीला गाढवांची विक्री केली जात आहे. प्रामुख्याने आंध्र प्रदेश व हैदराबाद हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे.

Animal Smuglling : गुजरातमधून 15 हजाराला खरेदी

सांगली, मिरज, कुपवाड, धुळगाव, नांद्रे, सोनी, भोसे, आरग, बेडग, जत, कवठेमहांकाळ व पलूस येथे गाढवांचा वीट, वाळू, मुरूम व माती वाहतुकीसाठी वापर केला जातो. गुजरातमधून 15 हजाराला एक गाढव विकत आणले जाते. ही टोळी एक गाढव एक ते सव्वालाख रुपयाला विकत असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

Animal Smuglling : दूध गुणकारी, कातडीचा आजारावर वापर

गाढवीचे दूध लहान मुलांसाठी गुणकारी औषध मानले जाते. दररोज दोन चमचा या प्रमाणात तीन दिवसांसाठी दूध देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये घेतले जातात. रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला व महिलांमधील गर्भाशयाच्या आजारावर औषध तयार करण्यासाठी गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो. उत्तेजना वाढविण्यासाठीही गाढवाचे मांस फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT