Latest

Pune BJP Office उद्घाटनाच्या निमित्ताने इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या (Pune BJP Office) उद्घाटनाच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांसह इच्छुकांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. या शक्तीप्रदर्शनामुळे झालेल्या गर्दीमुळे नागरिकांना चांगलाच फटका बसला. महापालिका भवनासमोरील रस्त्यावर व्यासपीठ उभारल्याने या रस्त्यावरून धावणाऱ्या अनेक बसेस गर्दीत अडकून पडल्या. शेवटी हा रस्ता बंद करावा लागला.

शहर भाजपने मंगला थिएटरच्या शेजारीच मुख्य कार्यालय सुरू केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन आज संध्याकाळी करण्यात येत होते. यानिमित्ताने आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयासमोरील शिवाजी पूल तसेच महापालिका भवन समोर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. तसेच महापालिका भवन समोरील अर्ध्या रस्त्यावर सभामंडप आणि कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. (Pune BJP Office)

पहाटेपासूनच धुक्याची चादर लपेटलेल्या पुण्यात दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. तर अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक संथ होती. अशातच संध्याकाळी या कार्यक्रमामुळे शिवाजी पुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या भाजप कार्यालयाबाहेर गर्दी झाल्याने पुणे मुंबई रस्त्याने येणार्‍या बसेस उजवीकडे महापालिका भवनसमोरून धावत होत्या. त्याचवेळी महापालिका भवनमागील स्टॉपवरून येणार्‍या बसेस व अन्य वाहनेही याच रस्त्याने येत असल्याने सभेमुळे अर्ध्याच रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच मोठय बसेस उजवीकडे वळत असल्याने शिवाजीरोडने शिवाजीनगरकडे जाणार्‍या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन शिवाजी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

स्मार्ट शहराचे स्वप्न दाखविणार्‍या सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या दारातच बेकायदा होर्डींग्ज उभारून विद्रुपीकरणात भरच घातली आहे. परंतू हे विद्रुपीकरण रोखण्याची जबाबदारी असलेले पालिका प्रशासनही बघ्याची भुमिका घेत असतील तर सत्ताधारी भाजपची महापालिकेतील दादागिरी दिसून येते. अगोदरच कोरोनाचा सामना केलेल्या पुणेकरांसमोर ओमीक्रॉन व्हेरीयंटचा धोका आहे. अशा परिस्थितीत 'शक्तीप्रदर्शन' करून सत्ताधारी भाजप संकटात अधिकच भर घालत आहे. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणार्‍या भाजपने थोडे अंतरंगात डोकावून पाहावे.

– प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT