Latest

भांगेत कुंकू भरून पोरकटपणातून केला विवाह, अल्पवयीनवर बलात्कार; अल्पवयीन वधूवरांची बाल सुधारगृहात रवानगी

मोहन कारंडे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : वर चौदा वर्षांचा तर वधू सोळा वर्षे वयाची. खेळण्या-बागडण्याच्या वयात दोघांत मैत्री झाली, मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. चित्रपटात शोभेल या पद्धतीने दोघेही घरातून पळून गेली. भांगेत कुंकू भरून दोघांनी पोरकटपणे विवाहही केला. पण जेव्हा प्रकरण उघडकीस आले त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. पोरकटपणाच्या या प्रेमाने मुलीचे आयुष्य उध्वस्त केलेच पण अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली त्या चौदावर्षीय वधूला आणि त्यांना मदत करणार्‍या आणखी एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात जावे लागले आहे.

ही घटना दक्षिण गोव्याच्या पोलिस हद्दीत घडली आहे. या घटनेत अल्पवयीन मुलीची रवानगी महिला आश्रय घरात करण्यात आली आहे पण सध्या तिची तब्येत खराब असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचा अल्पवयीन मित्र आणि चौदा वर्षांचा अन्य एक साथीदार यांना अपना घर येथे पाठवण्यात आले आहे. ही मुलगी गोमंतकीय असून ते दोघेही परप्रांतीय आहेत.

सविस्तर माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगा आणि त्या मुलीचा भाऊ दोघेही मित्र आहेत. त्यामुळे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. तो भावाच्या परिचयाचा असल्याने त्यांच्यात सुरुवातीला मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. बर्‍याच काळापासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होती. त्यांच्या घरच्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हते. चार दिवसांपूर्वी दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा बेत आखला. कोणालाही न सांगता दोघेही घर सोडून पळून गेली. रात्री मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटूंंबाने पोलिस स्थानकात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला.

नातलगाच्या घरी गेला आणि सापडला…

चौकशी दरम्यान त्या परिसरातून दोन अल्पवयीन मुलेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवस पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जिवाचे रान केले होते. एकीकडे पोलिस आणि त्या मुलीचे कुटूंब त्यांचा शोध घेत होते तर दुसरीकडे ती तिघेही एका निर्जनस्थळी लपून बसली होती. या मुलाने आपल्या गावात याच वयात लग्न लावले जाते, असे सांगून तिला लग्नाला राजी करून तिच्या भांगेत कुंकू भरले, गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा तर्‍हेने त्यांनी कथित विवाह केला. तिला घेऊन तो आपल्या एका नातलगाच्या घरी गेला असता त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बायलांचो एकवटच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी दैनिक पुढारीजवळ बोलताना अल्पवयीनांच्या बाबतीतील हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होते. संबंधित पोलिस निरीक्षकांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळल्याचे सांगून त्यांचे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले. काही घटकांनी परप्रांतियांच्या बाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर टीका जरी केली असली तरीही गोव्यात घडणार्‍या गुन्ह्यांसाठी परराज्यातील लोक जबाबदार आहेत, हे नाकारता येणार नाही असे त्या म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT