Latest

परभणी : सेलू-मानवत रोड दरम्यान रेल्वेरूळ तुटला, कर्मचार्‍यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

स्वालिया न. शिकलगार

सेलू (परभणी)- पुढारी वृत्तसेवा : मानवतरोड-सेलू या रेल्वे मार्गावर मानवतरोड ते सेलू स्थानक दरम्यान असलेल्या ढेंगळी पिंपळगाव नजीक रेल्वेरुळ तुटला. धर्माबाद-मनमाड ही धावणारी मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे जात असताना रेल्वे रुळाचा स्लीपरचा एक भाग तुटल्याचे आढळले. ही घटना बुधवारी (दि.१९) रोजी सकाळी ७ ते ८ वाजेण्याच्या दरम्यान घडली. यामुळे रेल्वे त्याच ठिकाणी थांबविण्यात आली होती व दुरूस्तीनंतर तिला तेथून रवाना करण्यात आले.

सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव ते सेलू रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्रमांक २५५/२-३ येथे रूळ तुटल्याने या मार्गाची पाहणी करणार्‍या गँगमन लल्लनसिंग यांच्या निदर्शनास ही बाब आली होती. यामुळे मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे ही मानवत रोडवरून सेलूच्या दिशेने रवाना झाली होती. गँगमन लल्लनसिंग याने पहिल्यांदा मराठवाडा एक्सप्रेसला थांबविण्यासाठी खबरदारी घेत रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली होती.

या रेल्वे रूळ तुटलेल्या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पीडब्ल्यू आय उत्तम कुमार, मनोज कुमार, जीआरपीचे एस.बी.कांबळे, संजय सुरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याच दरम्यान मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वे घटनास्थळाच्या ठिकाणी संथगतीने येऊन पोहोचली होती. तुटलेल्या रुळाला क्लॅम सहायाने दुरुस्त करून मराठवाडा एक्सप्रेसला याठिकाणाहून सकाळी ७.३९ वाजता सेलूकडे रवाना करण्यात आले होते. तसेच सेलूहून ८:३४ वाजता ही रेल्वे पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.

या घटनेत गँगमन ललनसिंग यांने वेळीच सतर्कता दाखविल्याने मराठवाडा एक्सप्रेसला होणारी मोठी संभाव्य दुर्घटना टळली. रेल्वे अधिकार्‍यांनी या घटनेची दखल घेत रुळाला क्‍लॅम बसवून रेल्वेची वाहतूक काही वेळातच पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. रेल्वे रुळाचा एक स्लीपर कशामुळे तुटला याचे कारण अद्याप समोर आले नाही. यामुळे छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे तसेच परभणीहून जालन्याकडे जाणार्‍या रेल्वेच्या काही फेर्‍या विलंबाने धावत आहेत. रूळाची कप्लिगं तुटली होती ती अर्ध्या तासाने नवीन बसवून मार्ग सुरळीत केल्याची माहिती स्टेशन मास्तर सुर्यवंशी यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार गँगमनसह रेल्वे प्रशासनातील कामांसाठी सतर्क असलेल्या कर्मचार्‍यांना सदर रेल्वे रुळाच्या स्लीपरचा एक भाग तूटल्याचे लक्षात आले. रेल्वे गार्ड तसेच लोको पायलट चालकांना ही बाब समजताच त्यांनी प्रसंगावधान राखून रेल्वेची गती कमी करत ती थांबवली. काही वेळानंतर मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वे जालन्याकडे रवाना झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT