Latest

BJP Party meeting : भाजप खासदारांनी आता लोकसभेच्या तयारीला लागावे – PM मोदी

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकांनंतर आता खासदारांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. सरकारच्या योजना लोकापर्यंत पोहोचवाव्यात, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना आज (दि.७) दिला. तसेच भाजप सरकारच्या कार्यकाळात भाजपच्या विजयाची टक्केवारी कॉंग्रेस पेक्षा उजवी असल्याचेही प्रतिपादन मोदींनी केले. (BJP Party meeting)

संसद अधिवेशनादरम्यान दर आठवड्याला भाजप संसदीय पक्षाची बैठक होत असते. संसदीय पक्ष बैठकीत संसदेतील नियोजन आणि पक्ष संघटनेचे कार्यक्रम यावर पंतप्रधान बोलत असतात. त्यापार्श्वभूमीवर भाजप संसदीय पक्षाची हिवाळी अधिवेशनातील पहिली बैठक आज झाली. यावेळी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, राज्यसभेतील सभागृह नेते पीयुष गोयल यांच्यासह सर्व बडे नेते आणि भाजप खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील यशाबद्दल पंतप्रधान मोदींचे स्वागत पक्षाध्यक्ष नड्डा यांनी पुष्पहार घालून केले. (BJP Party meeting)

याप्रसंगी बोलताना मोदींनी या विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांना दिले. तसेच हा सांघिक भावनेचा विजय असल्याचे प्रतिपादन देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान पुढे म्हणाले, की हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. हे केवळ एका व्यक्तीचे कष्ट नाहीत. सर्वांच्या मेहनतीमुळेच आम्हाला हा विजय मिळाला आहे. आपल्यासाठी महिला, तरुण, गरीब, शेतकरी या चार जाती आहेत. आपण जातीपातींमध्ये विभागले जाता कामा नये. (BJP Party meeting)

संसदीय पक्षाच्या बैठकीच्या प्रारंभी पंतप्रधान मोदींनी मिचॉन्ग चक्रीवादळ तसेच तामिळनाडूत पुराचा बसलेला फटका याबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील विजयाव्यतिरिक्त भाजपची ताकत मिझोरम आणि तेलंगाणामध्येही वाढल्याचा दावा केला. पंतप्रधान म्हणाले की, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये काम केल्याचा भाजपला फायदा झाला असून, या ठिकाणच्या साठ जागा जिंकता आल्या आहेत. राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत येण्याच्या भाजपच्या यशाचे प्रमाण ५८ टक्के आहे. तर कॉंग्रेसच्या यशाचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी लाभार्थ्यांशी संपर्क साधून सरकारच्या योजनांबद्दल त्यांना सांगावे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. विश्वकर्मा योजना घराघरात पोहोचवावी, केंद्रीय योजना लोकांपर्यत न्याव्यात. विकसीत,भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा मात्र स्वतःही त्यासाठी मैदानात उतरावे, अशा सूचनाही पंतप्रधान मोदींनी केल्या.

मोदीजी नको तर फक्त मोदी म्हणा

भाजपमध्ये पक्ष संघटनाच सर्वोच्च आहे. कोणताही नेता पक्ष संघटनेपेक्षा मोठा नाही, असे स्पष्ट करताना पंतप्रधान मोदींनी आपल्याला मोदीजी नको तर फक्त मोदी म्हणा, असे आवाहन मंत्रीमंडळातील तसेच पक्षातील सहकाऱ्यांना व खासदारांना केले. मोदीजी उल्लेखावरून आक्षेप व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की असे बोलून खासदारांनी आणि पक्षातील नेत्यांनी आपल्यापासून दूर करू नये. मोदीजी ऐवजी मोदी म्हटल्याने अधिक जवळीक वाटते, अशीही टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT