Latest

अर्थकारण : तीर्थक्षेत्रे नवी अर्थक्षेत्रे

Arun Patil

देशातील तीर्थक्षेत्रे ही नवी अर्थक्षेत्रे म्हणून विकसित झाली आहेत. काशी येथे या वर्षात दोन कोटी भाविकांनी भेट दिली आणि तेथे 10 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात ती अधिक असू शकते. ही तीर्थक्षेत्रे अर्थकारणाला गती देत असून, लाखो हातांना थेट रोजगार देत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात काशी येथील श्री विश्वनाथ मंदिराला 25 लाख भाविकांनी भेट दिली. मागील वर्षी 18 लाख भाविकांनी भेट दिली होती. काशी हे हिंदू धर्मातील मानले गेलेले सर्वात पवित्र शहर. मोक्ष देणारे तीर्थस्थान, असाही त्याचा लौकिक. त्याचवेळी देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी ते एक. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशी मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. 900 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या बाबा विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते 2021 मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे श्री विश्वनाथाच्या दर्शनासाठी गंगा घाटावरून थेट जाण्याचा मार्ग मोकळा झाला. हे सगळे विस्ताराने सांगण्याचा हेतू इतकाच की, काशी हे आता म्हणूनच पर्यटकांचे आवडीचे ठिकाण झाले आहे. पर्यटकांचा वाढत जाणारा हा ओघ शहरातील अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरत आहे. हॉटेल, धर्मशाळा, दुकाने भरभरून वाहत आहेत. पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येने काशीचा समृद्ध इतिहास तसेच संस्कृती यांची महती जगभरात पोहोचत आहे. संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक लाभ करून देणारी अशी ही गोष्ट.

2023 या वर्षात दोन कोटी भाविकांनी भेट दिली, असे देवस्थानने म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वाधिक संख्या. काशी हे धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक प्रमुख आहे. शतकानुशतके श्रद्धाळू भाविक 'काशी यात्रा' करत होते. आता काशी सुंदर, स्वच्छ झाल्यामुळे हौशी पर्यटकही तेथे जात आहेत. अलीकडच्या वर्षांत या शहराचा झालेला विकास पर्यटकांना आकर्षित करत आहे. 2023 या वर्षात पर्यटनातून येथे 10 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी ही उलाढाल सहा हजार कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच प्रत्येकाने सरासरी 5 हजार रुपये येथे खर्च केले. यात निवासाची व्यवस्था, भोजन, प्रसाद, अन्य खरेदी, नातेवाईकांसाठी घेतलेल्या भेटवस्तू (यात गंगेचा गडू, अष्टगंध – काशीतील अष्टगंध विशेष प्रसिद्ध आहे) आदींचा समावेश असेल. मलईदार केशर लस्सी, तसेच आलू टिक्की ही काशी येथील खाऊगल्लीची खासियत. चटपटीत खाद्यपदार्थ, नावेतून करण्यात येणारी गंगेची सैर यांचे पर्यटकांना विशेष आकर्षण असते. विशेषतः संध्याकाळची गंगा आरती. ही पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येत असतात. पर्यटन उद्योग हा रोजगाराचे प्रमुख साधन. एक लाखांहून अधिकांना तो थेट रोजगार देतो. यात हॉटेल कर्मचारी, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगार, दुकानदार, गाईड तसेच रिक्षाचालक यांचा समावेश होतो. 'नमामि गंगे' अंतर्गत करण्यात आलेली गंगा नदीची स्वच्छता अधिकाधिक पर्यटकांना काशी येथे खेचत आहे. पर्यटनातून मिळणारा महसूल सरकार या प्रकल्पासाठी तसेच वृक्षारोपणासाठी करत आहे.

उत्तर प्रदेशाला वाढती पसंती

2022 या वर्षात उत्तर भारताला 10 कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. यात 40 लाख विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. 2023 मध्ये हीच संख्या 12 कोटींपर्यंत पोहोचली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात वाढही होऊ शकते. अद्याप दोन महिने बाकी आहेत. म्हणजेच देशांतर्गत पर्यटनात उत्तर प्रदेशने अन्य राज्यांना मागे टाकत सर्वाधिक पसंतीचे राज्य असा लौकिक मिळवला आहे. काशी, आग्रा येथील ताजमहाल, लाल किल्ला, अयोध्या यासह अनेक महत्त्वाची धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे येथे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटकांना ती आकर्षित करतात. त्याशिवाय अनेक नैसर्गिक ठिकाणेही पर्यटकांना साद घालत असतात. पायाभूत सुविधांसाठी सरकार मोठ्या प्रमाणात करत असलेली गुंतवणूक पर्यटकांना खेचण्यात यशस्वी होत आहे. उत्तर प्रदेश सरकार पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवत आहे. त्यासाठी त्यांनी विशेष प्लॅन तयार केले असून वेबपोर्टलही बनवले आहे, ज्यायोगे पर्यटकांना नियोजन करणे सोपे जाते.

उत्तर प्रदेशमधील पायाभूत सुविधांचा असलेला अभाव ही प्रमुख समस्या होती. आज देशातील सर्वाधिक द्रुतगती मार्ग तेथे बनले आहेत, उभारले जात आहेत. रस्ते, स्वच्छता यांच्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. अलीकडच्या काही वर्षांत तेथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अग्रक्रमाने सोडवला. म्हणूनच महिलांसाठी तसेच विदेशी पर्यटकांसाठी ते सुरक्षित बनले. 2025 पर्यंत 20 कोटी पर्यटकांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण जानेवारी महिन्यात होत आहे. त्यामुळे 2024 मध्येच 20 कोटी पर्यटक उत्तर प्रदेशला भेट देतील, असे निश्चितपणे म्हणता येते. पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन पर्यटन स्थळेही विकसित केली जात आहेत. 'अवध हेरिटेज सर्किट' तसेच 'बुंदेलखंड हेरिटेज सर्किट' यांचा यात समावेश आहे. कॉर्बेट नॅशनल पार्क तसेच दुधवा नॅशनल पार्क यांसारखी इको टुरिझमला प्राधान्य देणार्‍या स्थळांचाही विकास करण्यात येत आहे. वैद्यकीय सुविधा विकसित करून वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. 20 कोटी पर्यटक एखाद्या राज्यात भेट देणार असतील, तर तेथील अर्थव्यवस्थेत ते किती कोटींची भर घालतील, याचा अंदाज बांधता येईल.

महाराष्ट्रातील चित्र

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे महाराष्ट्रातील पवित्र असे ठिकाण. 'जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर' तसेच 'आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी', असेही म्हटले जाते. असा महिमा असलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्री चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी अशा चार एकादशांना यात्रा भरतात. त्यात सर्वाधिक गर्दी ही आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेला होते. यात 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. भागवतधर्मीय संत-महंतांनी नावारूपाला आणलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राची मात्र अनवस्था झालेली दिसून येते. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी निश्चित असा आराखडा आखण्यात आला आहे. पंढरपूरचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास आहे. पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे भाविकांची गैरसोय होते. अरुंद गल्ल्या आणि अस्वच्छता यामुळे येथे मुक्कामी येणार्‍या भाविकांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. पर्यायाने पंढरपूर या तीर्थक्षेत्राची दुरवस्था कायम आहे. स्थानिकांनी नवीन विकास आराखड्याला विरोध केला आहे.

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई, तुळजापूर येथील श्री भवानी माता, जेजुरीचा श्री खंडोबा, अष्टविनायक, याशिवाय बारा जोतिर्लिंगांपैकी अनेक स्थाने महाराष्ट्रात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना राबवल्या, तर महाराष्ट्रातही येणार्‍या भाविकांच्या, पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. पर्यायाने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. मात्र, त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती हवी. पायाभूत सुविधांचा विचार करता महाराष्ट्रात मुंबई-पुणे तसेच समृद्धी महामार्गाचा अपवाद वगळला तर अन्य कोणताही द्रुतगती मार्ग नाही. कोणताही नवा प्रकल्प उभा करताना त्याला होणारा विरोध पाहता नवीन प्रकल्प उभा राहात नाही.

उत्तर प्रदेशचे अनुकरण करत महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्राला बळ देण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देणे आवश्यक आहे. चांगला अनुभव आला तर एक पर्यटक अन्य दहा पर्यटकांना राज्याकडे वळवतो. आज महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्राधान्याने उत्तर प्रदेशात जाताना दिसून येतात. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे काम पूर्ण झालेच आहे, लोकार्पण बाकी आहे. ते जानेवारी महिन्यात होत आहे. ते झाल्यावर तर तेथील पर्यटनात किती वाढ होईल, याचा विचार करता येईल. म्हणूनच उत्तर प्रदेशची वाटचाल विकसित राज्याकडे होताना दिसून येते. तीर्थक्षेत्रे ही देशाची नवीन अर्थक्षेत्रे आहेत. ती अर्थकारणात मोलाची भूमिका बजावत आहेत. लाखो रोजगारांची निर्मिती त्यातून होतेच; त्याशिवाय मोठ्या संख्येने होणारी आर्थिक उलाढाल समाजातील सर्व घटकांना त्याचा थेट लाभ देत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT