Latest

CBSE 12th term 2 Result : प्रतीक्षेत असलेला सीबीएसईचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला  केंद्रिय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) १२ वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण टक्केवारी पाहता मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९४.५४% आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.२५ % आहे. हा निकाल तुम्हाला सीबीएसईच्या (CBSE Result 2022 )अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) शुक्रवारी सकाळी दहा वाजता बारावीचा निकाल जाहीर केला. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत ३.२९ टक्क्यांनी अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षेत ९४.५४ टक्के विद्यार्थीनी तर, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल ९८.९३ टक्के लागला. तर, केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९७.०४ टक्के लागला आहे. यंदा सीबीएसईचा बारावीचा निकाल ९२.७१ टक्के तर, महाराष्ट्राचा निकाल ९०.४८ टक्के लागला. सीबीएसई बारावीच्या लेखी परीक्षेसाठी टर्म वनला ३० टक्के, टर्म टूला ७० टक्के महत्त्व देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही टर्ममधील प्रात्यक्षिकांना समसमान महत्त्व देण्याचा देखील निर्णय बोर्डाने घेतल्याने बारावीच्या दुसऱ्या टर्मच्या लेखी परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्यांना मोठा फायदा झाला.

२०२२ च्या परीक्षेत ३३ हजार जणांना (२.३३%) ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाली.तर, १.३४ लाख विद्यार्थांना (९.३९%) ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे कळतेय. २६ एप्रिल ते १५ जून २०२२ दरम्यान घेण्यात आलेल्या परिक्षेत १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थी बसले होते. यातील १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी पास झाले.१५ हजार ७९ शाळा तसेच ६ हजार ७१४ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी कोरोना महारोगराईच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या.दुसऱ्या टर्मची परीक्षा ही एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाच्या आधी जाहीर होणारा सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल यावर्षी उशिराने जाहीर करण्यात आला.

पुढील महिन्यात कंपार्टमेंट परीक्षा

कंपार्टमेंट परीक्षा २३ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी कंपार्टमेंट परीक्षा देऊन एका विषयातील त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकतील. यामुळे वर्ष वाया जाणार नाही आणि कामगिरीत सुधारणा करता येईल. कंपार्टमेंट परीक्षा बारावीच्या सत्र दोनच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील कंपार्टमेंट परीक्षा देऊन त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करता येईल.

CBSE Result 2022 :या वेबसाईटवर पाहा निकाल

  • CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जा – results.cbse.nic.in
  • होमपेजवरील 'CBSE 12th term 2 results 2022' या लिंक वर क्लिक करा
  • रोल नंबर, जन्म तारीख आणि शाळेचा नंबर टाका
  • नंतर 'Submit' बटण वर क्लिक करा
  • तुमचा CBSE 12 वी चा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल
  • तुम्ही हे डाऊनलोड करून याची प्रिंट घेऊ शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT