Latest

कमळ चिन्हावर लढणार नाही : अजित पवार

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही. यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर आमचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आमचे विरोधक अशा अफवा पसरवत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. तसेच राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढविणार असल्याचे सांगत कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम लावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांपासून शरद पवारांसोबतच्या भेटीगाठींबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या भेटीगाठी कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र येतो. यात कुठेही 'मॅच फिक्सिंग' नाही. राजकारणात आम्ही आता पुढे गेलो आहोत, आता त्यात बदल होणार नाही. कुठेही आमच्यासोबत आलेल्यांना फसवणार नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले; तर माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही. स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असेही ते म्हणाले.

अधिवेशन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहिले होते. यासंदर्भातील प्रश्नावर, त्या
कार्यक्रमाबाबत आपल्याला कोणी सांगितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अयोध्येतील कार्यक्रमाबाबत निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट करून निमंत्रण मिळाल्यावर याबाबत निर्णय घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे यांच्या वादाबाबत मात्र अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली. भुजबळ हे ज्येष्ठ आहेत. त्यांना काय सांगायचे ते आम्ही सांगू; तर मराठा आरक्षणाबाबतची भूमिका सरकार म्हणून आम्ही विधिमंडळात जाहीर केलेली आहे. त्याबाबतची कार्यवाही सांगितलेली आहे. त्यामुळे आता याबाबत संभ्रम नको, असेही पवार म्हणाले.

जयंत पाटलांचे आरोप फेटाळले

70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करणार, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केला होता. यावर, त्यात काहीही तथ्य नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच श्वेतपत्रिका काढण्यात आली, चौकशा झाल्या. आता पुन्हा तो विषय कशाला? अशी विचारणा करून उलट हा भ्रष्टाचार सिद्ध केल्यास त्यातील 35 हजार कोटी तुम्ही घेऊन जा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

…तर राजकारण सोडेन

जिल्हा नियोजन समित्यांची कामे टक्केवारीचे अड्डे बनत चालल्याच्या आरोपावर, मी पुण्याचा पालकमंत्री आहे. कामात 000.1 टक्के मागितले असल्याचे दाखवा. मी राजकारण सोडेन, अशा शब्दांत त्यांनी सर्व आरोप फेटाळले.

जनता मोदींनाच निवडून देईल

देशात वेगवेगळ्या विचारधारा असलेले पक्ष काम करत असतात, त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आज देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखे दुसरे नेतृत्व नाही. अशा नेत्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. इंडिया आघाडीचे मल्लिकार्जुन खर्गे आणि मोदींमध्ये मोठा फरक आहे. खर्गे आणि मोदींमध्ये जनता मोदींना निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT