Latest

Adani Group News : अदानी समूहाला महावितरणची ऊर्जा; राज्यात वीज ‘मीटर’साठी १३००० कोटींचे कंत्राट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिंडेनबर्ग अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी उद्योग समूहाला महावितरणच्या कंत्राटामुळे ऊर्जा मिळणार आहे. राज्यात 'स्मार्ट वीज मीटर' बसविण्यासाठी महावितरणने 27 हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढले आहे. त्यातील 13 हजार 888 कोटी रुपयांचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या कंपनीकडे पुणे, बारामती, भांडूप, कल्याण आणि कोकण या महावितरणच्या परिमंडलातील स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम दिले आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण) ने राज्यातील स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपन्यांची माहिती गुरुवारी (दि. 21) प्रसिद्ध केली. या आदेशानुसार अदानी, एन.सी.सी., माँटेकार्लो आणि मेसर्स जीनस या कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे 27 हजार कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यातील जवळपास निम्म्या रकमेचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. त्यानुसार भांडूप, कल्याण आणि कोकण या परिमंडलात 63 लाख 44 हजार 66 वीज मीटर बसविण्यात येणार असून त्यासाठी 7 हजार 594 कोटी 45 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

बारामती आणि पुणे परिमंडलात 52 लाख 45 हजार 917 वीज मीटर बसविण्यात येतील त्यासाठी 6 हजार 294 कोटी 28 लाख रूपये खर्च येणार आहे. एन.सी.सी. कंपनीकडे नाशिक, जळगाव, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद या परिमंडलाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक आणि जळगाव या परिमंडलात 28 लाख 86 हजार 622 वीज मीटर बसविण्यात येणार असून त्यासाठी 3 हजार 461 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 27 लाख 77 हजार 759 वीज मीटर बसविण्यात येणार आहेत.

माँन्टेकार्लो या कंपनीला चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या परिमडलांत 30 लाख 30 हजार 346 वीज मीटर बसविण्याचे कंत्राट दिले आहे. या कामासाठी 3 हजार 635 कोटी 53 लाख रुपये खर्च येणार आहे. तर जीनस कंपनीकडे अकोला आणि अमरावती परिमंडलात 21 लाख 76 हजार 636 वीज मीटर बसविण्याचे कंत्राट दिले असून त्यासाठी 2 हजार 607 कोटी 61 लाख रुपये खर्च येणार आहे.

प्रथमच एवढे मोठे कंत्राट…

महावितरणच्या सर्वच परिमंडलात 2 कोटी 24 लाख 61 हजार 346 स्मार्ट मीटर बसविणार आहेत. त्यासाठी 5 हजार कोटी 69 लाख रुपये खर्च येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिलेले आहे.

एका मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे. ग्रामीण भागात बारा हजार रुपये ग्राहक लाईट बिलापोटी कित्येक वर्षात भरत नाहीत. त्यांचा मीटर नादुरुस्त झाला किंवा जळाला तर काय होईल? त्या ग्राहकांना कोणता मीटर देणार याबाबत स्पष्टता नाही.

– प्रताप होगाडे
राज्य अध्यक्ष, वीज ग्राहक संघटना

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT