Latest

Ratan Tata | ….तर टाटांचा सायरस मिस्त्री होईल! रतन टाटा यांना धमकीचा फोन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (former Tata Group Chairman Ratan Tata) यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ३५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. सदर संशयित व्यक्ती हा एमबीए पदवीधारक असून तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संबंधित बातम्या 

बुधवारी नियंत्रण कक्षाला फोन आला होता. कॉल करणाऱ्याने टाटांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आणि धमकी दिली की असे केले नाही तर टाटांचे (Ratan Tata) उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्यासारखे होईल. सायरस मिस्त्री यांचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला होता.

हा कॉल आल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पोलिसांनी त्यांच्या एका टीमला टाटांची सुरक्षा पाहण्यास सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या एका टीमला कॉल करणाऱ्याची माहिती गोळा करण्यास सांगितले होते.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कॉल करणाऱ्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक साहाय्य आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीने कॉलरचा शोध घेतला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकातील असल्याचे दिसून आले होते. पण त्याचा पत्ता शोधला असता तो पुण्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हा कॉल करणारा व्यक्ती गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या पत्नीनेही पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

पोलिसांनी फोन करणार्‍याचा कर्नाटकात शोध घेतला. पण संशयित व्यक्ती मूळचा पुण्याचा असल्याचे आढळून आले. त्याला गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार स्किझोफ्रेनिया असल्याचे निष्पन्न झाले. तो पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT