Latest

लोणावळ्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना; वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच चिमुकल्याचा स्विमिंग टॅंकमध्ये बुडून अंत

अमृता चौगुले

लोणावळा : ज्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब लोणावळ्यात आले, त्याच चिमुकल्याचा वाढदिवसाच्या आदल्या रात्री स्विमिंग टॅंकमध्ये बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना 13 जुलैच्या रात्री लोणावळा शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवबा अखिल पवार (वय 2 वर्ष, रा. सध्या शिक्रापूर, शिरूर, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. शिवबा आणि त्याची जुळी बहीण यांचा दुसरा वाढदिवस 14 जुलै रोजी होता आणि तो साजरा करण्यासाठी त्याचे कुटुंबीय शिक्रापूर येथून 13 जुलै रोजी लोणावळ्यात आले होते.

लोणावळ्यातील तुंगार्ली भागात असलेल्या 'पुष्पव्हीला' या बंगल्यात ते राहिले होते. त्याठिकाणी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास सर्वजण बंगल्याच्या आतमध्ये वाढदिवसाची तयारी करीत असताना शिवबा हा खेळत बाहेर आला आणि त्याचा तोल जाऊन तो स्वीमिंग पूलमध्ये पडला. काही वेळानंतर शिवबा जवळ कोठेच दिसत नाही. म्हणून त्याच्या आई वडील आणि नातेवाईक यांनी शोधा शोध सुरू केली पण तो सापडला नाही. अखेर ते जलतरण तलावा जवळ आले असता, त्यांना शिवबा जलतरण तलावाच्या पाण्यात आढळून आला. नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात जाऊन शिवबाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT