Latest

आयटी पार्कमुळे 15 हजार कोटींची उलाढाल शक्य

Arun Patil

कोल्हापूर : उद्योग आणि शैक्षणिक हब अशी ओळख असणार्‍या कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रात घोडदौड होणार आहे. आयटी पार्कला मंजुरी दिल्याने ब्रेन ड्रेन थांबून कोल्हापुरातच आयटी क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतील. सध्या कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रात होत असलेली दरवर्षीची 1 हजार 500 कोटींची उलाढाल नवा आयटी पार्क सुरू झाल्यानंतर 15 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरचा चेहरामोहराच बदलणार आहे. कोल्हापूरच्या एकूणच उलाढालीत 15 हजार कोटी रुपयांची भर पडणार असल्याने प्रगतीचा आणखी एक टप्पा कोल्हापूर ओलांडणार आहे.

शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाच्या 30 हेक्टर जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. यामुळे शैक्षणिक हब आणि उद्योगांसाठी प्राईम लोकेशन असलेल्या कोल्हापूरला आणखी एक नवी ओळख मिळणार आहे. तसेच दरवर्षी कोल्हापुरातून पुण्या-मुंबईतील आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणार्‍या लाखो आयटी इंजिनिअर्सना आपल्याच जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल व लाखभर लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 350 हून अधिक नोंदणीकृत आयटी कंपन्या आहेत. यातील 50 कंपन्या तर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी काम करतात. सध्या या कंपन्यांमध्ये 8 ते 10 हजार जणांना रोजगार मिळाला असून आयटी क्षेत्राची वार्षिक उलाढाल 1 हजार 500 कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे आयटी तज्ज्ञांनी सांगितले.

कोल्हापूर प्राईम लोकेशन

कोल्हापूर हे मेट्रो सिटीजसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून पाच ते सात मोठ्या विमानतळांना बाय रोड पोहचणे सहज शक्य आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठासह अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था कोल्हापुरात आहेत. यामुळेच मुंबई व पुण्यातील काही कंपन्या कोल्हापुरात शिफ्ट होत आहेत. भौगोलिकद़ृष्ट्या महत्त्वाचे स्थान आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ येथे सहजरित्या उपलब्ध होतो. यामुळे आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर हे प्राईम लोकेशन मानले जाते.

इंटरनॅशनल एक्सपोजर मिळणार

आयटी पार्कमुळेच पुणे-बेंगलोर ला मोठा महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे जगभरामध्ये आज पुणे, मुंबई, बेंगलेरची आयटी हब म्हणून ओळख झाली आहे. मोठ्या प्रमाणत आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे आल्या आणि लाखो लोकांना रोजगार मिळाला. आयटी पार्क सुरू झाल्यानंतर कोल्हापूरलाही इंटरनॅशनल एक्सपोजर मिळेल. यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कंपन्याही येतील. याचा फायदा स्थानिक कंपन्यांसह कोल्हापुरातील गुंतवणुकीला होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT