Latest

106 मशिदींचा रस्त्यावर नमाज पठण न करण्याचा निर्णय

Arun Patil

भाईंदर ; राजू काळे : मुंबईसह मिरा-भाईंदरमधील 106 मशिदींच्या व्यवस्थापनांनी ऐन रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर नमाज पठण न करण्याचा निर्णय घेत भोंग्याच्या आवाजाला देखील मर्यादेत ठेवण्याचा सामाजिक ऐक्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मीरारोड येथील नयानगर या मुस्लिम बहुल भागामध्ये असलेल्या शहरातील सर्वात जुन्या व प्रशस्त दुमजली अल शम्स मशिदीचे विश्वस्त मुझफ्फर हुसेन यांनी भोंग्यावरून उठलेल्या वादळावर जर्मन तंत्रज्ञानाचा पर्याय शोधून भोंग्याचा आवाज मर्यादीत ठेवला आहे. तसेच नमाज पठणासाठी वेगवेगळी वेळ निश्चित करून रस्त्यावर नमाज अदा न करण्याचा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाचे पालन केले. त्यामुळे अल शम्स मशिदीचा आदर्श ठेवत मुंबईसह मिरा – र्भांदरमधील मशीदींनीही रस्त्यावर नमाज पठण बंद केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मीरारोडमधील अल शम्स मशिदीचे विश्वस्त मुझफ्फर हुसेन यांनी मशिदीवरील भोंगे काढुन मशिदीत बसवले. जर्मन तंत्रज्ञानाद्वारे भोंग्यांचा आवाज मशिदीपुरताच मर्यादित ठेवून आवाजाची पातळी निश्चित केली. तसेच मशिदीत तंत्रज्ञांनाद्वारे अरबीतील नमाजाचे उर्दू भाषेत रूपांतर करून कुराणातील उपदेश विस्तृत करून सांगितले जात आहे. यामुळे कुराणातील उपदेशांबाबतचे गैरसमज दुर होण्यास मदत होईल असे अल शम्स मशिदीत नमाज पठण करणार्‍यांनी सांगितले.

असे केले नमाजाचे नियोजन

एकाचवेळी नमाज पठण करणार्‍यांची मशिदीत गर्दी होते. त्यामुळे मुस्लिम बांधव रस्त्यावर नमाज पठण करतात. परिणामी, वाहतुक कोंडी होत असल्याने रस्त्यावरील नमाज बंद केला. अल शम्स मशिदीतील नमाजाची वेळ विभागून मशिदीत एकाचवेळी जेवढी लोकं बसू शकतील त्यांनाच नमाज पठणासाठी सामावून घेत उर्वरीत लोकांसाठी दुसरी वेळी देण्यात आली.

अल शम्स मशिदीतील नियमांचा अवलंब आता मुंबईतील कुलाबा ते वांद्रे व कुलाबा ते वडाळा दरम्यानच्या 78 तर मिरा-भाईंदरमधील 28 अशा एकूण 106 मशिदींनी ऐन रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केला असून त्यांचा हा निर्णय सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने मोठा असल्याचे अल शम्स मषिदीचे विश्वस्त मुझफ्फर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT